१२ मोबाईल-दागिने असा ३ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर :
गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथक फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना मिळालेल्या खबरीनुसार जुना पुना नाका येथील प्रभाकर महाराज मंदिरकडे जाणारे रस्त्याजवळील बस पार्किंगच्या मोकळ्या मैदानात एक तरूण थांबला असून तो लोकांना स्वस्तात मोबाईल विकण्यासाठी आला आहे. त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी करता, तो आंतरराज्य सराईत चोरटा आहे. त्याच्या ताब्यातून ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर चोरीचे गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देवून, सदरचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचे, गुन्हे करण्याचे पध्दतीचा अभ्यास केला. त्यासंदर्भाने मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी वरील ठिकाणी मोबाईल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या हिंदी भाषिक तरुणास ताब्यात घेतल्यावर त्याच्या झाडाझडतीत त्यांचेकडील लाल रंगाचे पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व एकूण १२ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळून आले.
गुन्हे शाखेच्या तपासात मोनुकुमार सतीश महतो (वय- १९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बडी भगीयामारी, सकरीगली, सकरीगली रिवर ब्लाक, साहेबगंज, झारखंड, सध्या राहणार ताजबाग, नागपूर) असे त्याचे नांव असल्याचे स्पष्ट झाले.
त्याच्याकडे मिळून आलेल्या दागिन्यांबाबत व मोबाईलसंबंधी सुनिल दोरगे व.पो.नि. गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली व लातूर येथील भाजी मार्केट येथे जावुन गर्दीचा फायदा घेवुन लोकांची नजर चुकवून शर्टच्या वरील खिशातील व पॅन्टच्या पाठीमागील खिशातील मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. तसेच सोलापूर शहरातील एस.टी. स्टॅन्ड व सराफा बाजार येथील महिलांचे दागिने चोरी केल्याचे कबूली दिली.
सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपींकडून ३ लाख ६२ हजार रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज, त्यामध्ये २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १२ मोबाईल फोन, असा मुद्देमाल हस्तगत केला, सोलापूर शहरातील ०६, कोल्हापूर-०४, लातूर - ०३ व सांगली - ०१ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्या पाटील, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, चालक बाळासाहेब काळे यांनी पार पाडली.