राज्य शासनाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात. या योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून 'शासन आपल्या दारी' हे अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यात दिनांक १५ एप्रिल २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील जवळपास १८ जिल्ह्यातील लाखो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत गतिमान पद्धतीने शासकीय योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल त्या त्या जिल्ह्यातील लाभार्थी ही शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधानी असल्याचे दिसून येत आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासकिय योजनांचा उपक्रमांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे स्थानिक स्तरावर होऊन लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ (१३ मे २०२३) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक १५ एप्रिल २०२३ पासून शासन आपल्या दारी' हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे राज्य स्तरावरून समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. तर सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना करून या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ही या अभियानाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून तालुकास्तरावरील तालुका जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने विविध आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित विभागाला पात्र लाभार्थी यादी तयार करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावरून गावोगावी जाऊन पात्र लाभार्थ्याचे सर्वेक्षण करून त्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षाशी योग्य समन्वय ठेवण्यात येत आहे.
'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाने ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी एक लाखा पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात अकरा तालुके असून प्रत्येक तालुक्याला १२ हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. संबंधित महसूल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक तालुक्याला या उपक्रमांतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट दिलेले असून तालुका स्तरावरून तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या मार्फत इतर तालुकास्तरीय शासकीय विभागाकडून हे उद्दिष्ट पूर्तता करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. सर्वसामान्य लाभ मिळवून देणारी शासकीय कार्यालये वेगवेगळया ठिकाणी असतात. ती सर्व एकत्रित एका छताखाली आणून विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळून दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे, कागदपत्रातील त्रुटी बाबत संबंधित लाभार्थ्याला तात्काळ अवगत करून त्यांच्याकडून त्रुटीची पूर्तता करून घेतली जाऊन त्यांना जागेवरच लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सोलापूर जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' हा जिल्हास्तरीय उपक्रम संभाव्य माहे सप्टेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरपूर येथे होणे नियोजित आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांची गतिमान अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना थेट लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच शासन व प्रशासन यांच्या बद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला जात आहे. तसेच जिथे गरज तिथे मदत अथवा लाभ मिळवून देण्याचे नियोजित आहे.
विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना अवगत असतेच असे नाही, तर अशा लाभार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी शासनाने शासन आपल्या दारी' हे अभियान सुरु केले आहे. आज पर्यंत राज्यातील जवळपास १८ जिल्ह्यातील लाखो पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन शासन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध योजनांची एकाच छताखाली लाभार्थ्यांना लाभ देण्याची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने होत असून या उपक्रमाचे "योजना कल्याणकारी... सर्वसामान्यांच्या दारी" हे ब्रीद पूर्णपणे सफल होत आहे.
जिल्हा सोलापूर प्रशासन शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शासकीय योजनाचे लाभार्थी निवडीचे दिलेले ७५ हजाराचे उद्दिष्ट पेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याच्या तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
सुनील सोनटक्के,
जिल्हा माहिती अधिकारी,सोलापूर.