सोलापूर/प्रतिनिधी : माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आणि बहुचर्चित चलचित्रण बातमीच्या माध्यमातून लोकशाही वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' वृत्त वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ पाठीमागे घ्यावेत, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात हल्ली बातमी लावण्यवरून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? असा संतप्त सवाल प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकारला विचारला आहे. बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होण्याची बाब पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनिय आहे. असे गुन्हे दाखल झाले तर समाजविघातक प्रवृत्तींचे मनोबल उंचावणार आहे. त्यांच्यावर कोणताही अंकुश राहणार नाही, पर्यायाने संपूर्ण पत्रकारिता धोक्यात येण्याची भीतीही यशवंत पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल करण्यात आल्याने भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आज धोक्यात आला असल्याची खंत पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार यांनी व्यक्त केली. संपादक कमलेश सुतार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची तात्काळ चौकशी होण्यापूर्वी दाखल गुन्हे पाठीमागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.