चला, आपण धाब्यावर जाऊ... !

shivrajya patra


चला, आपण धाब्यावर जाऊ...
( हेरंब कुलकर्णी)

मी त्यांना म्हणालो 
 पाण्यात तरंगणारे तुमचे
 नागपूर शहर आपण पाहू

ते म्हणाले 
नको नको,
 त्यापेक्षा आपण,
 धाब्यावरच जाऊ.....!!!

धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
 दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ? 
ते म्हणाले " हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?" 

मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर, 
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले .....

न्यायमूर्ती लोया नागपुरात,
 नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
 समोर मेन्यू कार्ड धरले ...

शेतकरी आत्महत्या भागात,
 दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा , 
जेवणाची ऑर्डर काय देऊ या  ?

मी विचारले कंटाळून,
 अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
 तुम्ही गिफ्ट काय घेणार ?

कंटाळून विचारले शेवटी मी - 

९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
 रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
 पत्रकारांची
 ताडोबात ट्रीप कधी काढायची ?

आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
 सत्तेची नशा करते, किती बेधुंद 
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..

 हेरंब कुलकर्णी.

.............. 

आजकालच्या सत्ताधाऱ्यांना सत्ता मिळवण्यासाठी व मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी ना-ना हातखंडे वापरावे लागतात. त्यात प्रामुख्याने 'साम, दाम, दंड, भेद' या चतु :सूत्रीकडे पाहिले जाते. कालानुरूप सत्ता बदलल्या सत्ता मिळविण्याचे मार्ग बदलले, आज संवैधानिक मार्गाने सत्ता मिळवावी लागते, असा साधा भोळा समज आहे. या समाज भावनेला छेद देत विरोध संपवण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजा, त्यांना धाब्यावर घेऊन जा मला जे म्हणायचं होतं, ते आपण समजला असालच !  असाही सल्ला त्यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी, २४ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बूथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले.
पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना ढाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

ते असंही म्हणाले, ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बूथवर जे चार, पाच पत्रकार आहेत. त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. 

महाविजय २०२४ पर्यंत बूथसंदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, विरोधात बातम्या न येण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा,  ढाब्यावर नेण्याचा सल्ला प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिला. 
गेल्या ४ दिवसात यासंबंधी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना हेरंब कुलकर्णी यांनी 'चला, आपण धाब्यावर जाऊ' लिहिलं आहे, जे सामाजिक माध्यमांवर लहानांपासून मोठ्यापर्यंत पसंतीला उतरलं आहे.
To Top