सोलापूर : बीबीदारफळ येथे झालेल्या हल्ल्यात ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी बापु ननावरे गंभीररित्या जखमी झाले. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ला प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून आरोपितांना गजाआड करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील सरपंच सौ.अर्चना विठ्ठल ननावरे यांचे सासरे तथा ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी बापू ननावरे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ७ कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी घडली. जखमीस छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची बाब राजू खरे यांना कळताच, त्यांनी हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना, कॉल करुन संबंधित गुन्हेगारांवर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
यासंबंधी राजू खरे यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांची भेट घेऊन या प्रश्नी चर्चा केली असल्याचे खरे यांनी सोशल मिडीयाच्या शिवसेना (उत्तर सोलापूर) ग्रुपवर शेअर केले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत सुधीर गोरे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख, श्री. प्रकाश पारवे, समाधान खंदारे, विठ्ठल ननावरे, अमर सोनावले, समाधान बाबर, सोनु शिंदे आदी उपस्थित होते.