सार्वजनिक उत्सवात डी.जे. डॉल्बी सिस्टीम नकोच !प ूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहरात अलीकडे सार्वजनिक उत्सव मिरवणुकात मोठ्या प्रमाणात डी.जे./साऊंड सिस्टिम चा सर्रासपणे वापर होताना दिसून येत आहे. यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबर सार्वजनिक शांतता भंग होऊन उत्सवाला गालबोट लावण्याचे प्रकार समाजकंटक करीत असल्याचे अत्यंत गंभीर प्रकार होत आहेत.  शहरात काढण्यात येणाऱ्या सार्वजनिक उत्सव मिरवणुकात डी.जे.ला परवानगी देऊ नका, अशा मागणीचे निवेदन पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने संस्थापक विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांना देण्यात आले आहे.


सदर निवेदनात सोलापूर शहर हे उत्सव प्रिय शहर आहे परंतु या उत्सव प्रिय शहराला गालबोट लावण्याचे प्रकार या डी.जे साऊंड सिस्टिम मुळे होत आहे. डी. जे. चा प्रदूषणाने लहान मुले-मुली, वृद्ध,आजारी नागरिक अशा अनेकांना जिवे देखील गमावावे लागले आणि गमावले गेले.

त्याचबरोबर सार्वजनिक उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भाविक भक्त बंधू-भगिनींना डी.जे. समोर नाचणारे मद्यधुंद युवक गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींना छेडछाड करणे, अश्लील डान्स व नकला करणे, असे वाईट प्रकार होत आहेत. यामुळे एकमेकांत विनाकारण भांडणे होऊन संपूर्ण मिरवणुकीत अशांतता निर्माण होऊन आनंदाच्या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते. अशातच दुर्दैवाने गर्दीत एखादी अफवा पसरली तर मिरवणुकीत सामील झालेल्या लाखो जनसमुदायात गोंधळ उडून सामान्य लोकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी काळ हा सणासुदीचा काळ असून श्री गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, ईद-ए-मिलाद, दिवाळी अशा राष्ट्रीय सण येणार आहेत. याचा विचार करता, सोलापूर शहरात सर्व सार्वजनिक उत्सव व उत्सव मिरवणुका डी.जे. ला परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांना विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. त्यांच्या समवेत राजशेखर रोडगीकर, अॅड. मुनिनाथ कारमपुरी, सुलेमान चामकोरा, शहानवाज कंपली, शिवा ढोकळे, विठ्ठल कुराडकर, जरगीस मुल्ला, रमेश चिलवेरी, गोवर्धन मुद्गल, विजय निली, नागार्जुन कुसुरकर, सुरेश शिंदे, शिवशंकर मंजुळे यांचा समावेश होता*
----------------------------------------
To Top