देशाच्या सांस्कृतिक जडण-घडणीत आहे प्रत्येक धर्मियांचे योगदान : प्रा. डॉ. श्रीकांत येळेगांवकर

shivrajya patra
सोलापूर : 
अलिकडच्या काळात 'गर्व से कहो... ' अशा घोषणा वाढल्या आहेत, त्या देशाच्या प्रगतीत अडसर आणणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व धर्मियांनी योगदान देऊन भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे,  कोणताही धर्म मानवता शिकवतो, देशाच्या सांस्कृतिक जडण-घडणीत प्रत्येक धर्मियाचे योगदान आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीकांत येळेगांवकर यांनी केले.
येथील साखर पेठेतील, जॉईन फॉर पीस मल्टीटीपर्पज सोयायटीच्या वतीने गुरूवारी, २१ सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात मानवतावादी कार्य केलेल्या प्रा. डॉ. श्रीकांत येळेगांवकर, आंबेडकरी चळवळीतील प्रमोद गायकवाड, मुजम्मील कमलीवाले (पंढरपूर) आणि फादर जेसॉन अॅन्थोनी ( प्राचार्य-सेंट थॉमस स्कूल, सोलापूर) या समाजसेवकांना जे.पी. शांतता पुरस्कार देऊन सन्मानित आले. प्रा.डॉ. श्रीकांत येळेगांवकर सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम होते. 
प्रारंभी जॉईन फॉर पीस मल्टीटीपर्पज सोसायटी, सोलापूर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी आपल्या प्रास्ताविकात, संस्थेच्या वाटचालीवर ओझरता प्रकाशझोत टाकताना, संस्थेने सकल सामाजिक शांतता, बंधुता नांदावी, या सद्हेतूने सामाजिक क्षेत्रात मानवतावादी कार्यात योगदान दिलेल्या मानवतावादी समाजसेवकांना जे.पी. शांतता पुरस्कार देण्याचे कार्य सुरू केले. जे. पी. शांतता पुरस्कार - २०२३ हे पुरस्कार प्रदानाचे पाचवं वर्ष असल्याचे सांगितले.
जॉईन फॉर पीस मल्टीटीपर्पज सोसायटी, समाजातील दुबळ्या वर्गासाठी शिक्षण, रोजगार आणि आर्थिक उत्थानासाठी करीत असलेल्या कार्याचं कौतुक करताना, प्रा. डॉ. येळेगांवकर बोलताना पुढे म्हणाले, सर्वत्र धार्मिक उन्मादाचे वातावरण आहे. यंदा अनंत चतुर्दशी गणेशोत्सव विसर्जन आणि ईद ए मिलादुन्नबी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले आहेत. अशा वेळी जुलुस कमिठीने जुलुस मिरवणूक दुसऱ्या दिवशी काढण्याचा घेतलेला निर्णय धार्मिक सौहार्दाला हातभार लावणारा आहे, असे म्हटले.
आपल्या देशात प्रामुख्याने ७ धर्म, ७ हजार जातीचे लोक राहतात. हिंदी, इंग्रजी या शासन चालविण्याचे प्रमुख भाषा असल्या तरी अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. या सर्व समाजात भाईचारा वृद्धिंगत होण्यासाठी  ' गर्व से कहो, हम ... ' च्या ऐवजी 'गर्व से कहो, हम इन्सान है' म्हणण्याची गरज आहे. सर्वांनी समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या विचारावर चाललं पाहिजे, असे आवाहनही प्रा. डॉ. येळेगांवकर यांनी शेवटी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. जैनोद्दीन मुल्ला, उपाध्यक्ष इरफान लालकोट, सचिव प्रा जैनुद्दीन पटेल, सहसचिव अल्लाबक्ष सय्यद खाँ, खजिनदार म. शफिक रचभरे, सदस्य म.सलिम शिकलगर, अकबरखान, अॅड. आसिफ शेख, महेबूब पटेल, प्रा. इन्नुस शेख, जावेद मुजावर, सिकंदर सरोडगी, व्यवस्थापक नवाज नाईकवाडी यांच्यासह सोसायटीचे सभासद आणि नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
.......... चौकट ................

... सावकारी कर्ज काढू नका : जे. पी. 
पुरस्काराचे मानकरी प्रमोद गायकवाड

जे.पी. पीस अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलेले फादर जेसॉन अँथोनी, यांनी अस्खलित इंग्रजीत आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे आभार मानले तर मुजम्मील कमलीवाले (पंढरपूर) यांनी सत्काराला उत्तर देताना, समाजातील दुर्लक्षित आणि दुर्बलांसाठी कार्य करण्याची उर्मी वाढविणारा हा पुरस्कार असून पुढच्या वाटचालीला प्रेरणादायी आहे, असे त्यांनी म्हटले. 
       गरजू-छोट्या व्यवसायिकांना बिन व्याजी कर्ज देऊन उभे करण्याचा जे.पी. सोसायटीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. कुटुंब उद्धवस्त होतात, सावकारी कर्ज काढू नका, अशी कळकळीची विनंती जे. पी. शांतता पुरस्काराचे मानकरी प्रमोद गायकवाड यांनी यावेळी केले.

......... चौकट ..........

देशातील मुस्लिमांची स्थिती मागासापेक्षाही 
दयनिय : माजी आमदार कॉ.नरसय्या आडम

सच्चर कमिशनच्या मतानुसार, या देशातील मुस्लिमांची परिस्थिती मागास समाजापेक्षा दयनिय आहे. या समाजाच्या शैक्षणिक, रोजगार आणि आर्थिक उन्नतीकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. जे.पी. सोसायटीचे पदाधिकारी, आपलं काम करीत असताना समाजामध्ये बदल घडवून आणण्याचे काम करीत आहेत, ही अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे असे प्रतिपादन माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात केले.
........................................
To Top