कोर्सेगावात लाख मोलाची गोवा दारु जप्त
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथे गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेला एक लाख, सात हजार, पाचशे वीस किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुकानात किराणा मालाबरोबरच बेकायदेशीरपणे परराज्यातील दारू विक्रीस ठेवली जात असल्याचे या छाप्याने जन माणसांसमोर आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी, ०६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब विभागाच्या पथकाने कोर्सेगाव गावाच्या हद्दीत चंद्रकांत अरवत याच्या किराणा दुकानात सकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेला विदेशी दारूचा साठा जप्त केला.
या कारवाईत इम्पिरिअल ब्लू व्हिस्की ब्रॅंडच्या विदेशी मद्याच्या १८० मिली. क्षमतेच्या ६७२ सीलबंद बाटल्या विभागाने जप्त केल्या. त्याची सरकारी किंमत रु. एक लाख, सात हजार, पाचशे वीस इतकी असल्याचे सांगण्यात आले. संशयित आरोपी चंद्रकांत पंडित अरवत (रा. कोर्सेगाव) हा फरार असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. फरार आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पुढील तपास दुय्यम निरिक्षक अक्षय भरते करीत आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक अक्षय भरते, रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती/वाहतूक/विक्री/साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास, या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सोलापूरचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.