Type Here to Get Search Results !

अमानुष लाठीचार्जचा निषेध नोंदवत ऊळेगांवातही रास्ता रोको; आरक्षण लागू करण्याची मागणी

 
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यात शांततामय पध्दतीने आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीचार्जचा एकमुखी निषेध नोंदवत तुळजापूर रस्त्यावरील ऊळेगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजास तात्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी केली. 
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी मराठा समाजाचे युवक-तरुणांनी शांततामय रितीने आंदोलन सुरु केले होते. त्या आंदोलकांवर शुक्रवारी, ०१ सप्टेंबर रोजी पोलीस बलाचा वापर करीत अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. त्यात महिला- लहान मुलेही सुटू शकली नाहीत. या अमानुष घटनेनंतर राज्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमठत आहेत. 
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभर शांततामय पध्दतीने रास्ता रोको आंदोलन करून त्या घटनेचा निषेध नोंदविण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने काल करण्यात आले होते. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून पुणे महामार्गावर बाळे, अक्कलकोट मार्गावर कर्देहळ्ळी फाटा, हैदराबाद रस्त्यावर दोड्डी फाटा आणि तुळजापूर मार्गावर ऊळेगांव येथील राष्ट्रमाता जिजाऊ ओव्हर ब्रिजवर रविवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
या प्रकरणातील दोषींवर तात्काळ अत्यंत कडक कारवाई करून सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशा आशयाच्या मागण्यांचं निवेदन तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, ते पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारले. या रस्ता रोको आंदोलनामुळे तुळजापूर मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.
यावेळी मनोज गुंड, मनोज बचुटे, उत्तम शिंदे, दत्तात्रय खंडागळे, शंकर वाडकर, यशपाल वाडकर, प्रविण चौगुले, सूर्यकिरण भोसले, हणमंत नरवडे, प्रशांत शिंदे, माऊली डांगे, नाना गोवर्धन, प्रदीप राऊत, राहुल ढोकळे, शिवाजी मोहिते, महेश गुंड, तायप्पा खंडागळे, नंदकुमार शिंदे, सतिश शिंदे, संदीप क्षिरसागर यांच्यासह ऊळेगांव, कासेगाव, ऊळेवाडीसह पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.