Type Here to Get Search Results !

वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून १०० व्या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती



२ उद्योजक मित्रांनी दिली ३२ हजारांची शिष्यवृत्ती
मदत करूनही नाव गुप्त ठेवण्याचा दाखविला मोठेपणा          
 (३२ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीची रक्कम प्रा. प्रमोद शिवगुंडे यांच्याकडे सुपूर्द करताना कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार, राजशेखर बुरकुले, प्रा. अतुल कंदले, प्रा. संघप्रकाश व्यास, बिपीन मायकल, चेतन लिगाडे छायाचित्रात दिसत आहेत.)

सोलापूर : एक दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी... वडिलांचे छत्र हरपलेलं... आई दुसऱ्यांच्या घरात स्वयंपाक काम करायची... त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे... तिला पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात प्रवेश घ्यायचा होता... फीची रक्कम होती ३२ हजार... तेवढी रक्कम तर जवळ नव्हती... तेवढ्या रकमेची जुळवाजुळव करणेही अशक्य होते... अशावेळी वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी आपल्या दोन उद्योजक मित्रांकडून तिला ३२ हजारांची शिष्यवृत्ती मिळवून दिली.

त्या विद्यार्थिनीची फी भरण्याची अडचण कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या निदर्शनास आली होती. बिराजदार यांनी त्या विद्यार्थिनीची अडचण राजशेखर बुरकुले यांच्या निदर्शनास आणून दिली. बुरकुले यांना त्यांचे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका मित्रांनी जूनमध्ये मला एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती द्यावयाची आहे, कोणाला गरज असेल तर मला सांगा, असे सांगितले होते. मग बुरकुले यांनी त्या मित्रांशी संपर्क साधला. 

संबंधित विद्यार्थिनीची प्रवेश फीची अडचण त्यांच्यासमोर बोलून दाखवली. तेंव्हा ते उद्योजक मित्र व त्यांचे आणखी एक मित्र अशा दोघांनी मिळून त्या विद्यार्थिनीची ३२ हजार रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम बुरकुले यांच्याकडे सुपूर्द केली. व याचवेळी आमचे नाव कुठेही उघड करू नका, असे सांगत मनाचा मोठेपणा दाखविला.

संबंधित विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी कसबा गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलीटेक्निक महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. प्रमोद शिवगुंडे यांच्याकडे फीची ३२ हजारांची रक्कम सुपूर्द केली. याप्रसंगी राजशेखर बुरकुले, प्रा. अतुल कंदले, प्रा. संघप्रकाश व्यास, बिपीन मायकल, चेतन लिगाडे उपस्थित होते.