दुष्काळग्रस्त कासेगांव येथे करा चारा छावणी सुरू
सोलापूर : गेल्या पंचवीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात व जिल्हातील सर्वंच परिसरातील पिके करपून गेली आहेत. ऑगस्ट महिना संपत आला पण पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल बनला आहे. दुष्काळाच्या सावटाखाली असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे चारा छावणी सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
शेतीमधील पिके पाणी न मिळाल्याने पूर्णपणे करपून गेलेली आहेत. त्याचे पंचनामे करून दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, कासेगाव परिसरात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांचे अतोनात हाल होत आहेत. या परिसरात चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडी आणि क्रांती परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन युवा सोलापूर जिल्हा महासचिव अमोगी तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गाजरे, जिल्हा संघटक उस्मान शेख, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा कासेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोष माळी, दक्षिण सोलापूर तालुका महासचिव सचिन जाधव, ज्योती क्रांती परिषदेचे सोलापूर जिल्हा प्रवक्ता प्रा. रणजीत जाधव, सागर गायकवाड, विश्वनाथ खारे, मानकेश्वर वाघे, तालुका उपाध्यक्ष अविनाश कांबळे, सुहास जाधव, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमर काटकर, शाखा प्रमुख अब्दुल तांबोळी, कासेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उमेश काळे आदींसह वंचित बहुजन आघाडी आणि ज्योती क्रांती परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.