Type Here to Get Search Results !

क्रीडाविषयक सोयी सुविधांसाठी प्रयत्न करूया : आ. प्रणिती शिंदे

श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारांचा सत्कार

सोलापूर : ॲथलेटिक्समध्ये देशाने मोठी बाजी मारली आहे. खेळाडूंसाठी खुराक देण्याकरिता शासन योजना हवी. सर्व खेळांसाठी सोलापूर शहर जिल्ह्यात सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, पत्रकार व संघटना या सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे प्रतिपादन आ. प्रणिती शिंदे यांनी येथे केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा महासंघाचे सचिव महेश गादेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमाचा आढावा घेतला.

आ. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रामध्ये जात - पात, धर्म असा कोणताही भेदभाव नसतो. यश - अपयश स्वीकारले जाते. स्वच्छ दृष्टिकोन असतो. तो फार महत्त्वाचा आहे. सोलापुरात क्रीडासाठी सोयी सुविधांची मोठी कमतरता आहे. निधी उपलब्ध असतो. परंतु प्राधान्याने खर्च करणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समिती आणि नाविन्यपूर्ण योजनेतून क्रीडासाठी सोयी सुविधा करिता निधी उपलब्ध करून घ्यावा लागेल. पारंपरिक खेळांकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वच खेळाडूंसाठी खुराक देण्याची शासन योजना हवी. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

क्रीडा अधिकारी पवार म्हणाले, क्रीडा पत्रकार व छायाचित्रकार यांच्या योगदानामुळे खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळते. मेजर ध्यानचंद यांच्या काळात  हॉकी क्षेत्रात भारताचा सुवर्ण काळ होता. मधल्या काळात थोडी पीछेहाट होती मात्र आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

   सिंथेटिक ट्रॅक व इतर सुविधा उपलब्ध करणार

कुमठा नाका जवळील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. ॲथलेटिक्ससाठी सोलापुरात जिल्हा क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅक व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. आणखी सोयी सुविधा ही उपलब्ध करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

महेश गादेकर म्हणाले, इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापुरात क्रीडा चळवळ अधिक सक्रिय आहे. क्रीडा पत्रकारांचे कार्यही कौतुकास्पद आहे. सोलापुरात राजीव गांधी इंडोअर स्टेडियम येथे खेळाडू करीता हॉस्टेल आवश्यक आहे. 40 बेडचे हे हॉस्टेल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी मागणी गादेकर यांनी यावेळी केली. क्रीडा क्षेत्रांकडे प्रत्येक सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तरतूद होते पण खर्च होत नाही. त्यासाठी क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
    क्रीडा पत्रकार समीर इनामदार यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.

या क्रीडा पत्रकारांचा झाला सन्मान

यावेळी क्रीडा पत्रकार समीर इनामदार,वीरेश अंगडी,अजित संगवे, सूर्यकांत आसबे, सलमान पीरजादे
 रवींद्र दंतकाळे, राजकुमार माने, नितीन ठाकरे, प्रभुलिंग वारशेट्टी, रवी ढोबळे , कृष्णकांत चव्हाण आदींचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.