सोलापूर : जिल्ह्यात कुठेच पाऊस पडला नाही. सर्वत्र पावसाने सततची गैरहजेरी लावली असल्याने पिके करपून जात आहेत. अशा संकटाच्या स्थितीत जिल्ह्यातील कोणतेही मंडल न वगळता सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन बुधवारी, वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले.
शासनाने दुष्काळाची गडद छायेत असलेली २१ दिवसाचा खंड पडलेली जिल्ह्यातील ६६ मंडले घोषित केली. बोरामणी मंडलात गेले महिनाभर कसलाही पाऊस नसताना सुध्दा बोरामणी मंडल यातून वगळण्यात आले आहे. कासेगाव पंचक्रोशीतील खरीप पिके पावसाअभावी माना टाकून करपू लागली आहेत. या मंडलातील अपुऱ्या पावसाच्या चौकशीला पथक पाठवून बोरामणी मंडलाचा समावेश करून पिकांचे पंचनामे करायला लावावेत, असे निवेदन दक्षिण सोलापूर तहसिलदार जमदाडे यांना देण्यात आले. राज्य शासनाने या प्रश्नी सकारात्मक भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यात देण्यात आला.
तालुक्याचे तहसिलदार जमदाडे यांनी, या प्रश्नी आजच बैठक घेऊन त्याची चौकशी करून बोरामणी मंडलाचा यामध्ये समावेश करण्याच्या हालचाली करण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळास दिले.
यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे युवक जिल्हा महासचिव अमोगी तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गाजरे, प्रा. रणजित जाधव, राज सोनकांबळे, विजयकुमार गायकवाड, सुरेश देशमुख, विश्वनाथ खारे आदी उपस्थित होते.