Type Here to Get Search Results !

बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाचे ३७वे राज्य अधिवेशन परभणीत

सोलापूर : बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाचे
३७ वे राज्य अधिवेशन परभणी येथे रविवारी, २७ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.परभणी रेल्वे स्टेशन समोरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ९.३० वा. दरम्यान होऊ घातलेले अधिवेशन बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचे एका पत्रकान्वये सांगण्यात आले.

"छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाहीत."हा ऐतिहासिक निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी.व्ही.नलावडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनास प्रदीप पोळ (उपायुक्त आदिवासी विकास प्रकल्प विभाग, ठाणे), एम.एम.कोटुले (निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंता, महाजनको), विद्याधर माणगावकर (कामगार अधिकारी, परभणी), जयंत सोनवणे (उपायुक्त महानगरपालिका, परभणी), आणि एस.आर.बर्गे (प्रशासन अधिकारी, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

अधिवेशनाच्या तीन सत्रांमध्ये बहुजन समाजाच्या निगडित ९ वेगवेगळ्या विषयांवर राज्यातील १४ नामांकित विद्वान, विचारवंत उपस्थितांचे प्रबोधन करणार आहेत. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतील VVPT स्लिप ४ महिन्यात का नष्ट केल्या ?, EVM ची भुमिका व निवडणुक आयोगाद्वारा लोकशाहीचे मुल्य नष्ट करणे एक षडयंत्र, जर ओबीसी हिंदु आहेत तर शासक ब्राम्हण वर्ग ओबीसीची जातीनिहाय जनगणनेचा विरोध का करतात ?, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाही-मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, समान नागरी संहितेद्वारे (UCC) आदिवासींचा कस्टमरी लॉ समाप्त होणे, एस.सी.एस.टी.ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक लोकांवर हिंदूच्या नावावर ब्राम्हण धर्म थोपवणे हे एक षडयंत्रकारी अभियान आहे. अशा व इतर गंभीर विषयांवर प्रबोधन होणार आहे.

परभणी येथील अधिवेशनास आपल्या समस्या व त्यावरील उपाय ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सर्व बंधु व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोरखनाथ वेताळ (महाराष्ट्र राज्य प्रभारी, बामसेफ), मंगला थोरात (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पुर्ण कालीन प्रचारक योजना), अभिजित भगत (महाराष्ट्र राज्याध्यक्ष बामसेफ) व सुमित्र अहिरे ( राज्य कार्याध्यक्ष बामसेफ) यांनी केले असून बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.