Type Here to Get Search Results !

राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा नागरी सत्कार

सोलापूर : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या शुभहस्ते नागरी सत्कार विविध संघटनांच्या वतीने करण्यात आला. विजापूर रस्त्यावरील सोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सत्कार समिती माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ, बजरंग दल, गोसेवकांच्या वतीने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी, श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी, वेदांत स्वामी, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, माहेश्वरी जागृती मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश सोमाणी, माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गिरीधर भुतडा, प्राणी रक्षा समितीचे महेश भंडारे, ज्येष्ठ समाजसेवक विलास शहा, अमोल उंबरजे आदी उपस्थित होते. 
यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाल्यानिमित्त महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सत्कार सोहळा पार पडला. दरम्यान गोसेवा आयोगाकडून विविध क्रांतीकारी धोरणे हाती घेण्यात आले आहेत. गोसेवा करणाऱ्या संस्थांची नोंदणी करणे, जप्त केलेल्या वस्तूंची काळजी घेणे, पशुव्यवस्थापनासंबंधी जागृती करणे, संस्थांचे परीक्षण करणे, पशुसंवर्धन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या अंगीकरण संदर्भात समन्वय साधणे, गोसेवा संस्थांना निधी देणे, संस्थांच्या तक्रारीची चौकशी करणे, देशी गाईच्या संवर्धन संगोपन आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

या आयोगाच्या माध्यमातून राज्यातील गोवंशी पशुधनाच्या कत्तलीस आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतात सांगितले. 

यावेळी श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी उपस्थित गोरक्षकांना आशीर्वाचन केले. यावेळी गोरक्षक महेश भंडारे यांनी सांगितले की, गोवंश कायदा झाला तरी पोलिसांची भूमिका कायद्याला अनुकूल झालेली नाही. ही भूमिका बदलण्याची गरज व्यक्त केली. प्रास्ताविक अमोल उंबरजे यांनी केले तर सूत्रसंचालन काशिनाथ भतगुणकी यांनी केले.