पायताण म्हणू की पादत्राणं ... ती दाराच्या बाहेर सोडावी लागतात, याकडे एक संस्कार म्हणून पाहिलं जाते. पायातील पायताण घरात प्रवेश केल्यावर ठरलेल्या जागेवर सोडली जातात, ती कोणी माजघरात नेत नाही. जो ज्याला पूजतो, त्या देवघरात पादत्राणं घालून जाणं अश्रध्द वा असंस्कृतपणा मानला जातो. ह्या असंस्कृतपणाचं दर्शन सव्वाशे वर्षाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी रविवारी, २० ऑगस्ट रोजी अभिवादनाच्या वेळी दिलंय. त्यावर पक्षाच्या निष्ठावंतांच्या वक्तव्यातून नाराजी दिसून आलीय.
तो दिवस होता रविवारचा... दिनांक : २० ऑगस्ट, स्थळ : पक्ष कार्यालय... अन् निमित्त होतं, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जयंती दिवसाचं ... त्यांचा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. अगदी पक्ष स्थापनेपासूनचा त्यागाच्या इतिहासाची कार्यकर्त्यांपुढं पुन्हा-पुन्हा 'उजळणी' होते, जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यागाचा विसर पडू नये, ही प्रामाणिक तळमळ त्यामागे असते. सामान्य माणसाला नेता आणि पदाधिकारी एकसमान असतात, पण श्रद्धा अन् निष्ठा वेगळ्या असू शकतात. या तळमळीला निष्ठावंत समजू शकतील. निष्ठा काय असते, या जाणिवेचा विसर पडलेल्यांची निष्ठा रंगमंचावरची ! केवळ फोटोसेशन पुरतीच मर्यादित असावी, असं त्यांच्या हर्ष-उल्हासावरून दिसून आले.
रविवारी, प्रधानमंत्री तथा त्या पक्षाचे तत्कालिन सर्वोच्च नेते, आधुनिक भारताचे स्वप्न सत्त्यात उतरवू पाहिलेल्या स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी पक्ष कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलं होते. राजकीय पटलावरील सध्याची पळा-पळी अन् पळवा-पळवीतून उरल्या-सुरल्या नेते-कार्यकर्त्यांनी सद्भावनेने एकत्र येऊन सद्भावना दिवस साजरा केला. हा सोहळा साजरा होत असताना, त्यागाच्या इतिहासाचा विसर पडला होता, हेही दिसले.
स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती ही देशात सद्भावना दिवस म्हणून साजरा होत असताना, जिथे सद्भावनाच नाही तिथे गोंधळ, मारामारी असणारच याचाही 'नमुना' पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठांना अनुभवता आला. ती घटना अशिष्टाचाराची पुनरावृत्ती होती. स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करताना पदाधिकाऱ्यांना पायातील पादत्राणं काढण्यांचं भान राहिलं नाही. तो त्यांच्या काळजी वा चिंतेची बाब बनावी, हेही विशेषच !
कोणत्याही पूजनीय महापुरुष वा व्यक्तींना अभिवादन करताना पादत्राणे काढून अभिवादन करणे, अशी संस्कृती जपली जाते. त्या पक्षाची त्यागाची परंपरा, संस्कार हे उच्च कोटीचे, असे असूनही पादत्राणं पायात ठेऊन या पदाधिकाऱ्यांकडून नवी परंपरा निर्माण प्रयत्न झाला असावा अथवा पायातील किंमती पादत्राणे सोडणे म्हणजे इमेजला धक्का लागेल, याची अनाठायी भय या पदाधिकाऱ्यांना होतं का? अशी शंका आहे.
'हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए, दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए, हे बोल कृतीत असलेल्या थोर नेतृत्वापुढं नतमस्तक होताना, ज्यांनी आपली पादत्राणं सोडली नाहीत. ते एका भयापोटीच असावं अथवा पायाला धूळ लागण्याचंही भय असावे, मात्र पूजेच्या शिष्टाचाराला मूठमाती दिली असेच कोणी म्हटलं तर नवलं वाटू नये.
स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात सद्भावना दिवस साजरा झाला. या सद्भावना दिवशी सोलापुरात ज्या क्रमाने दोन घटना घडल्या, त्या सामान्य निष्ठावंतांच्या मनाला चटका लावणाऱ्या ठरल्या. या घटनेमुळे सर्वसामान्य मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले. त्यायातच हाणामारी केलेल्या पदाधिकाऱ्यांचं सायंकाळी मनोमिलन झाल्याचाही खुलासा झाला. या घटनांची सोलापूर शहरांमध्ये वेगळीच कुजबूज चालू आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता घ्यावी,
अशी सर्वसामान्य पक्ष प्रेमींची अपेक्षा राहणार आहे. नेत्यांवरील श्रद्धा आणि निष्ठा दाखविणाऱ्यांच्या मंडळींची त्यागाऐवजी पादत्राणांवरील 'नजर' ह्या असंस्कृतपणाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, असा सूर पक्षाच्या निष्ठावंतांच्या वक्तव्यातून उमठतोय, हे मात्र नक्की !