Type Here to Get Search Results !

मोहोळ तालुक्यात गाजलेल्या खून खटल्यातील सर्व आरोपी ११ वर्षानंतर निर्दोष


 कारंडे कुटुंबियांना मिळाला ११ वर्षानंतर न्याय 

सोलापूर : मोहोळ तालुक्यात गाजलेल्या संतोष शिंदे गुरुजी खून खटल्यातील कारंडे कुटुंबीयांतील सहा जणांची तब्बल अकरा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली. सोलापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधिश सौ. आर. एन. पांढरे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

०१ मार्च २०१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष शिंदे गुरुजी (रा. सारोळे, ता. मोहोळ) यांचा मृतदेह सोलापूर-पुणे महामार्गावर कचरे पेट्रोलपंपासमोर आढळून आला होता. तेथेच त्यांची दुचाकी मिळून आली होती. या प्रकरणी त्यांचे बंधू सौदागर शिंदे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष शिंदे गुरूजी दुचाकीवरून सारोळे गावी येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. 

पोलीस तपासादरम्यान भारत सोपान कारंडे (रा. सारोळे) यांनी १३ जुलै २०१२ रोजी जबाब देऊन संतोष शिंदे गुरुजींचा मृत्यू अपघाती नसून तर त्यांचा खून सौंदणे कटजवळील कदम वस्तीवर उसने दिलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून आलेल्या वैमनस्यतुन सिद्राम बाजीराव कारंडे (रा. सारोळे) व त्याचा जावई अंकुश कदम, मुलगी स्वाती कदम, जावयाचा भाऊ केशव कदम व नातेवाईक संतोष काळे आणि शोभा  डोंगरे यांनी कोयता, गज-काठी व इतर हत्यारांनी मारुन खून केल्याचे जबाबात म्हटले होते.  त्याआधारे सिद्राम कारंडे व इतरांविरूध्द गुन्हा दाखल होऊन तपासाअंती दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 

या खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान आरोपींचे वकील ॲड. धनंजय माने यांनी, हा खटला म्हणजे फौजदारी कायद्याचा सरळ सरळ दुरूपयोग करून आपल्या विरोधकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून कसा त्रास दिला जातो, याचे तंतोतंत उदाहरण आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अपघाताचे प्रकरण खुनात बदलण्यात आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा आणि  वैद्यकीय पुराव्यावरून शिंदे गुरुजींचा मृत्यू अपघाती असल्याचे सिध्द होते. आरोपींशी पूर्ववैमनस्य असलेल्या खोट्या साक्षीदारांच्या असंभवनीय आणि अनैसर्गिक साक्षीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, असा युक्तिवाद ॲड. धनंजय माने यांनी केला. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने , ॲड. सिध्देश्वर खंडागळे, ॲड. विकास मोटे यांनी तर सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲड. नागेश  गायकवाड यांनी काम पाहिले.

खोटा खटला दाखल केल्यामुळे अकरा वर्षे झालेल्या मानसिक, शारीरिक, व आर्थिक त्रास दिल्याबद्दल व बदनामी केल्याबद्दल आरोपीतर्फे फिर्यादी व साक्षीदार यांच्याविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.