सोलापूर : शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था, सोलापूर सोशल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सय्यद बादशाह हुसैन मगरबी यांची संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) पदावर नियुक्ती केली आहे.
सय्यद बादशाह हुसैन मगरबी यांना शिक्षण क्षेत्रातील 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यापैकी 25 वर्षे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. शालेय प्रशासन व नेतृत्व, शैक्षणिक नियोजन, अध्यापन, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच एसएससी बोर्डाच्या परीक्षांशी संबंधित विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
ते सोलापूर हेडमास्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, सुमारे 15 वर्षे त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. तसेच मेरिट कमिटीचे संस्थापक व संयोजक म्हणून त्यांनी सुमारे 20 वर्षे कार्य केलं आहे. एसएससी बोर्डाचे मॉडरेटर व मुख्य मॉडरेटर म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रेरणा देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनीही यश संपादन केले आहे.
सय्यद बादशाह हुसैन मगरबी यांनी एम. ए. (इंग्रजी साहित्य) ही पदवी प्राप्त केली असून, दख्खन एज्युकेशनल सोसायटी, गुलबर्गा येथे कायदा व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणूनही ते कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कौशल्य, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेता त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झालेली नियुक्ती संस्थेच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
