लेखकांनी विचारप्रवर्तक माहिती अत्यंत सोप्या आणि सुलभ शैलीत मांडली आहे : डॉ. अब्दुल रशीद शेख
यू. ई. एस. महिला महाविद्यालयाची 'उर्दू घर' ला शैक्षणिक सहल
'अहद-ए-अकबर में फारसी जबान व अदब की तारीख व इर्तिका' या पुस्तकाचे प्रकाशन
सोलापूर : यू.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर यांच्यावतीने "उर्दू घर शैक्षणिक सहल" आणि एस.एस.ए. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर व उर्दू विभाग पीएचडी संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. शफी चोबदार व यू.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर फारसी विभागाचे सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सुमय्या बागबान लिखीत 'अहद-ए-अकबर में फारसी जबान व अदब की तारीख व इर्तिका' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जमीयत उलेमा-ए-हिंद, सोलापूर शाखाचे अध्यक्ष मौलाना हारिस शेख, बी.क्यू. गर्ल्स ज्युनियर कॉलेजचे प्रा. डॉ. अब्दुल रशीद शेख आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागबान उपस्थित होते तर प्राचार्या प्रा. डॉ. झैनब नायब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रमुख पाहुणे मौलाना हारिस शेख यांनी सम्राट अकबराच्या कारकिर्दीतील फारसी भाषा आणि साहित्याचा इतिहास व विकास यावर संशोधन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "सम्राट अकबराच्या काळातील फारसी साहित्याचा इतिहास लिहिणे ही आजच्या काळाची गरज आहे."
प्रा. डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी पुस्तकाच्या अभ्यासपूर्ण आणि साहित्यिक पैलूंवर चर्चा करताना लेखकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, "लेखकांनी अत्यंत विचारप्रवर्तक माहिती सोप्या आणि सुलभ भाषेत मांडली आहे.
" ऐतिहासिक आणि साहित्यिक विषय सोप्या भाषेत मांडण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, जेणेकरून सामान्य वाचक आणि विद्यार्थी या दोघांनाही त्याचा लाभ घेता येईल. पुस्तकाची सोपी आणि समजण्यास सुलभ भाषा त्यातील अभ्यासपूर्ण आशय वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. सुमय्या बागबान यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. प्रा. डॉ. सदफ आरा चोबदार यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी आभार माने.
यू.ई.एस. महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनी आणि प्राध्यापकांनी महाविद्यालयापासून सोलापूर उर्दू घरापर्यंत रॅली काढली. विद्यार्थीनींनी उर्दू भाषा आणि साहित्याशी संबंधित सुविचार व काव्यपंक्ती लिहिलेले फलक हाती घेतले होते. उर्दू घरामध्ये आगमन झाल्यावर, उर्दू घराचे ग्रंथपाल साहिर नदाफ आणि 'उर्दू घर शैक्षणिक सहल'चे संयोजक प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी विद्यार्थीनी व प्राध्यापकांचे स्वागत केले.
याप्रसंगी त्यांना 'उर्दू घरा' ची उद्दिष्टे, शैक्षणिक उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली. ग्रंथालयाच्या भेटीदरम्यान, प्रा. डॉ. शफी चोबदार यांनी ग्रंथालयाची स्थापना, पुस्तकांचा संग्रह आणि वाचनाच्या उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनींना उपयुक्त ठरणारी पुस्तकेही ग्रंथालयाच्या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत, असं सांगून डॉ. चोबदार यांनी ग्रंथालयाची उपयुक्तता, वाचनाचे महत्त्व आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध शैक्षणिक संसाधने याबाबत विद्यार्थीनींना मोलाचे मार्गदर्शन व माहितीही त्यांनी दिली.
ही शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. अमर दीक्षित, डॉ. समीना सय्यद, प्रा. फरझाना पटेल, डॉ. मसरूर जहाँ, प्रा. आयेशा सौदागर, प्रा. इम्रान शेख, प्रा. जिब्रईल, प्रा. सदफ जहाँ, प्रा. रईसा मिर्झा, डॉ. कोरी आणि समीर यांनी परिश्रम घेतले.

