ग्रंथांशी मैत्री करा ! व्यसनांपासून दूर राहा : डॉ. विकास पाटील यांचे युवकांना मार्गदर्शन

shivrajya patra

राजा छत्रपती मंडळाचा स्तुत्य उपक्रम 

सैनिक टाकळी/प्रतिनिधी : वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच युवकांना व्यसनमुक्ती, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैलीची दिशा देण्याच्या उद्देशाने राजा छत्रपती मंडळ, सैनिक टाकळीच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या 36 वर्षांच्या सामाजिक वाटचालीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


प्रबोधन पुस्तक एक्सप्रेसच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवरील पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. मंडळाचे सदस्य, गावातील युवक तसेच गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांची पाहणी केली.


यावेळी प्रबोधन पुस्तक एक्सप्रेसचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी वाचन चळवळ, व्यसनमुक्ती आणि युवकांच्या वाढत्या आत्महत्यांच्या प्रश्नावर प्रभावी मार्गदर्शन केले.


“मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांच्या पानांशी मैत्री करा; कारण पुस्तक माणसाला केवळ ज्ञान देत नाही, तर विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देते,” असे सांगत डॉ.विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.


आजच्या काळात युवकांसमोर शिक्षण, रोजगार, स्पर्धा, सोशल मीडिया आणि विविध प्रकारच्या मानसिक तणावाची आव्हाने आहेत. या परिस्थितीत अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकून पुढे जाण्याची वृत्ती विकसित करण्याची गरज आहे. अडचणी मनात साठवून ठेवण्याऐवजी पालक, शिक्षक, मित्र किंवा विश्वासातील व्यक्तींशी संवाद साधा, असा महत्त्वपूर्ण संदेश डॉ. विकास पाटील यांनी दिला.


युवकांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी “एक अपयश म्हणजे संपूर्ण आयुष्याचे अपयश नव्हे”, असे स्पष्ट केले. जीवनातील अडचणी तात्पुरत्या असू शकतात; मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी संवाद, आधार आणि सकारात्मक प्रयत्न आवश्यक असल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.


व्यसनमुक्तीबाबतही त्यांनी युवकांना सावध केले. मित्रांच्या आग्रहामुळे किंवा केवळ कुतूहलापोटी सुरू झालेले व्यसन पुढे व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे व्यसनाला सुरुवातीलाच ठाम ‘नाही’ म्हणा, तसेच वाचन, खेळ, कला, कौशल्यविकास आणि विधायक उपक्रमांकडे वळण्याचे आवाहन डॉ. विकास पाटील यांनी केले.


“युवकांनी वेळ वाया घालविण्याऐवजी स्वतःतील कौशल्य ओळखावे. पुस्तक वाचा, प्रश्न विचारा, नवे कौशल्य शिका आणि आपल्या आयुष्याला स्वतः दिशा द्या,” असा प्रेरणादायी संदेश डॉ. विकास पाटील यांनी दिला.


दरम्यान, अकिवाट येथील श्री हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी सहभागी होत आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.


राजा छत्रपती मंडळाने गेल्या 36 वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या उपक्रमातून ‘वाचनातून विचार, विचारातून परिवर्तन आणि निरोगी समाजासाठी सकारात्मक जीवनशैली’ असा संदेश देण्यात आला.


यावेळी मंडळाचे  शामराव पाटील, अध्यक्ष आदर्श पाटील, सौरभ पाटील, अमित पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, अक्षय पाटील, बबन पाटील, दत्तात्रय पाटील, संयोग तवंदकर, विद्यार्थिनी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top