निरीक्षणातूनच संशोधनाची सुरुवात : प्रा. डॉ. मंजू संगेपाग सोशल महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन; पीपीटी प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

shivrajya patra

सोलापूर : भूगोल हा केवळ पुस्तकी ज्ञानाचा विषय नसून तो प्रत्यक्ष निरीक्षणातून शिकण्याचा विषय आहे. आपल्या सभोवतालच्या भौगोलिक घटनांचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यातून संशोधनाची सुरुवात होते आणि संशोधनाच्या माध्यमातून विविध समस्यांचे निराकरण करता येते, असं प्रतिपादन संगमेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. मंजू संगेपाग यांनी केले.


येथील सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन प्रा. डॉ. मंजू संगेपाग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचे सातत्याने निरीक्षण करून त्यातून प्रश्न निर्माण करावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे संशोधनाच्या माध्यमातून शोधावीत, असे आवाहन केले.


निरीक्षण, संशोधन आणि समस्या निराकरण यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना त्यांनी प्रसिद्ध भूगोलतज्ज्ञ अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट यांच्या कार्याचे उदाहरण दिले. तसेच सागरी संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मेरी थार यांच्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. जिज्ञासा, निरीक्षण आणि चिकित्सक दृष्टिकोन या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, असंही त्यांनी सांगितले.


‘भूगोलाची प्रयोगशाळा म्हणजे संपूर्ण पृथ्वी’


दैनंदिन जीवन जगताना आपण नकळत भूगोल शिकत असतो. हवामानशास्त्र, भू-आकृती, वसाहतींचा विकास, मानवी भूगोल अशा विविध घटकांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान आत्मसात न करता प्रत्यक्ष निरीक्षण, क्षेत्रभेट आणि अनुभवातून शिकणे म्हणजेच खऱ्या अर्थाने भूगोल शिकणे होय. भूगोलाची प्रयोगशाळा म्हणजे संपूर्ण पृथ्वीच आहे, असे प्रा. डॉ. संगेपाग यांनी स्पष्ट केले.


पीपीटी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव- कार्यक्रमानिमित्त आयोजित पीपीटी प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. मंजू संगेपाग यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक जिआउल्द रहमान खाटीक, द्वितीय क्रमांक सिमरन मुजावर, तर तृतीय क्रमांक हबीब काखंडीकर यांनी पटकावला.


भूगोलातून रोजगाराच्या विविध संधी - कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी यांनी भूगोल विषयातील विविध रोजगार व करिअरच्या संधींवर प्रकाश टाकला. भूगोल विषयाच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन, नियोजन, GIS व रिमोट सेन्सिंग, पर्यावरण, प्रशासन तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजगुरू सचिन तसेच डॉ. दीपक नारायणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. डी. शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. तबस्सुम मोमीन यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन डॉ. वाहिद जमादार यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मंजू संगेपाग. यावेळी प्राचार्य डॉ. आय. जे. तांबोळी, डॉ. सचिन राजगुरू , डॉ. दीपक नारायणकर व मान्यवर उपस्थित होते.

To Top