🌟 आराध्य दैवताला भावपूर्ण निरोप !

shivrajya patra



 🌟 आराध्य दैवताला भावपूर्ण निरोप !

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात कसबा गणपतीच्या श्रींची विसर्जन मिरवणूक; ढोल - ताशांचा गजर, लेझीमचा थरार अन् पुष्पवृष्टीने भक्तिमय वातावरण


सोलापूर : बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक हलगीचा निनाद, गुलालाची उधळण, लेझीम पथकाचे आकर्षक सादरीकरण आणि श्रींच्या मूर्तीवर भाविकांकडून होणारी पुष्पवृष्टी यामुळे मिरवणुकीचा मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सोलापूरचे आराध्य दैवत श्रीमंत मानाचा कसबा गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.


पहाटे साडेपाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी सुहास दर्गोपाटील यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. सकाळी आठ वाजता विजापूर येथील भाविकांच्या हस्ते श्रींची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस उत्साहात सुरुवात झाली.


मिरवणुकीच्या अग्रभागी सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेने सजलेली बैलजोडीची बग्गी होती. त्यामागे पारंपरिक हलगी, ढोल-ताशा व बँड पथक, बैलजोडी, हलगीच्या तालावर नाचणारे अश्व, लेझीम पथक तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि लेझीमच्या तालावर कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या खेळाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


मिरवणूक बाळीवेस चौकात पोहोचल्यानंतर प्रथम सामूहिक आरती करण्यात आली. भाविकांनी श्रद्धेने श्रींचे दर्शन घेतले. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्यामुळे संपूर्ण वातावरणात भक्ती आणि भावनेचा संगम अनुभवायला मिळाला.


“भाविकांचे प्रेम आणि सहकार्य सदैव स्मरणात राहील”

यावेळी उत्सव अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू म्हणाले, “सोलापूरचे आराध्य दैवत श्रीमंत मानाचा कसबा गणपती हे सोलापूरकरांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी दिलेले प्रेम, सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे उत्सवाला विशेष ऊर्जा मिळाली. मंडळाच्या माध्यमातून धार्मिक उपासनेसह सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज श्रींचे विसर्जन करताना मन भावुक झाले आहे. सर्व सोलापूरकरांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच पुढील वर्षी श्रींचे आगमन अधिक उत्साहात व्हावे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.”


दत्त चौक येथील गणपती घाटावर उत्सव अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांच्या हस्ते श्रींच्या उत्सव मूर्तीचे श्रीकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत श्रींना भावपूर्ण निरोप दिला.


याप्रसंगी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले, ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने, ट्रस्टी सहसचिव शिवशंकर कोळकूर, ट्रस्टी खजिनदार केदार मेंगाणे, उत्सव उपाध्यक्ष सुभाष गुंदगी, शिवानंद सोन्ना, अजय येळमेली आणि उत्सव सचिव पुष्कराज मेत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.


यांच्यासह विश्वस्त अॅड. मिलिंद थोबडे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, बिप्पीन धुम्मा, रामचंद्र जोशी, शिवानंद बुगडे, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, बाळासाहेब मुस्तारे, बाळासाहेब भोगडे, सोमनाथ मेंगाणे, अमित गुंगे, अनिल मसरे, योगिराज भोगडे, प्रशांत धुम्मा, नागनाथ मेंगाणे, चिदानंद मुस्तारे, संदीप जोशी, योगेश हदरे, गुरुशांत मोकाशी, शशिकांत बिराजदार, आनंद मुस्तारे, इरप्पा राजमाने आणि संजय बिराजदार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भक्ती, उत्साह आणि भावनेने भारलेल्या वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सोलापूरचे आराध्य दैवत श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.

To Top