सोलापूर : अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक प्रश्नांचा प्रभावीपणे आढावा घेण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात तातडीने जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समिती गठित करावी, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सलाहोद्दीन बाशा शेख यांनी केली.
सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात त्यांनी सोमवारी निवेदन सादर केले. जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर सक्षम समन्वय यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समन्वय साधून कार्यवाही करण्यासंबंधी समितीची असावी महत्त्वाची भूमिका - अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक योजनांचा नियमित आढावा घेणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी जाणून घेणे आणि संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून त्यावर आवश्यक कार्यवाही करणे, ही समितीची महत्त्वाची भूमिका असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्याची मागणी - प्रस्तावित समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेणे आणि लाभार्थ्यांच्या अडचणी संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देणे शक्य होईल. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाला आवश्यक सूचना आणि शिफारसी सादर करता येतील, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समितीमध्ये प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांचा करावा समावेश - जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समितीमध्ये अल्पसंख्याक समाजाशी संबंधित प्रमुख शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचा तसेच आवश्यकतेनुसार संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश करावा. समितीची रचना, कार्यकक्षा आणि जबाबदाऱ्या निश्चित करून समितीच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात, अशी मागणीही सलाहोद्दीन शेख यांनी केली.
अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना जिल्हास्तरावर प्रभावी विचारपीठ मिळावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समिती तातडीने गठित करून तिचे कामकाज सुरू करावं, अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते अर्जुन सलगर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सिद्रामप्पा तिगंळी, नागेश माने, इम्तियाज दर्जी, रमजान अंडीकर, शिवसेना नेते नागेश पाचकांडी, मुस्ताक शेख, इम्तियाज दर्जी, जिहान बागवान, माथाडी कामगार शहराध्यक्ष लक्ष्मण भोसले, आरिफ शेख, जलील नदाफ, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संपर्कप्रमुख रजाक मुजावर, आरिफ एलाल, बनसोडे यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



