... अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास साधावा पोलीसांशी संपर्क : पोलीस आयुक्त एम राज कुमार

shivrajya patra

गणेशोत्सव- 2026 च्या अनुषंगाने पार पडली शांतता समितीची बैठक

सोलापूर : आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शांतता समिती सदस्य आणि नागरीकांना केलं.

गणेशोत्सव- 2026 च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुधवारी, 02 सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक पार पडली. गणेशोत्सव शांतता कमिटी बैठक पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एम. राज कुमार बोलत होते.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रारंभी प्रस्तावना करताना, ही बैठक आयोजन करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

सर्वत्र 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर. टी. ओ. कडून तपासणी करावी. 

मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणूक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेऊ नये. मिरवणुकीच्या वेळी ट्रिपलशिट फिरू नये, वाहनांचे सायलेंन्सर च्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नये, तसेच हुल्लडबाजी करू नये. मिरवणुक मार्गात बदल करू नये. 

अन्य धर्मांच्या भावना दुखावणार नाही, याचीही काटेकोर दक्षता घ्यावी. मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील आणि श्री मुर्तीची देखभाल करतील, याची पुरेपूर काळजी घ्यावी, असंही यावेळी सांगण्यात आलं.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्या नंतर या सूचनांशी संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर. टी. ओ., धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी या कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असं सांगितलं.

पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी बैठकीस उपस्थित नागरिकांचं प्रारंभी स्वागत करुन त्यांनी मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच आवश्यक तेथे योग्य तो बंदोबस्त नेमू, असं सांगून गणेश उत्सवानिमित्त पोलीस आयुक्तांनी शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचं आभार मानले.

*** चौकट 

... मार्गदर्शक सूचना !

✨ शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. 

✨ गणेशोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जबरदस्तीने वर्गणी मागू नये. 

✨ सर्व मंडळांनी आपल्या मंडळाची रितसर धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करावी. 

✨ उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, 

✨ मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा.

✨ मोकाट जनावरांपासून श्री मुर्तीला धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

✨ देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, 

✨ मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. 

✨ तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. 

✨ देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरूष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी, प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावेत. 

✨ सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. 

✨ डीजे मुक्त सोलापूर शहर साठी सर्व मंडळांबरोबर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली.

**

... चौकट 

परवानगी बंधनकारक !

ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था 

गणेशोत्सव-2026 मंडळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावं, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं.

**

--- चौकट 

... यांची होती उपस्थिती 

या बैठकीस, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्रीमती वृष्टी जैन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-2) श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री, गुन्हे शाखा दिलीप पवार, वाहतुक शाखा मनोज यादव, श्रीमती. विना पवार (महानगर पालिका), सुर्यवंशी (धर्मादाय उपायुक्त), तसेच महावितरण सोलापूर अग्नीशामक दलाचे, सिव्हील हॉस्पीटल सोलापूर, आर.टी.ओ.चे अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी-पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकार बंधू उपस्थित होते.

**

To Top