आजचा युवक शिकलेला आहे, तंत्रज्ञानाच्या जवळ आहे, जग त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये आले आहे; तरीही त्याच्या मनात अस्वस्थता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता वाढताना दिसते. शिक्षण, करिअर, नातेसंबंध, आर्थिक अडचणी, व्यसनाधीनता, सामाजिक अपेक्षा आणि अपयशाची भीती यांचा ताण काही तरुणांना असह्य होतो. आत्महत्या हा त्या वेदनेचा अंतिम टोकाचा प्रतिसाद असतो.
म्हणूनच केवळ आत्महत्येच्या घटना मोजून हा प्रश्न सुटणार नाही. युवकांच्या मनात जगण्याची उमेद, संघर्षाची ताकद आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे.
महापुरुष फक्त जयंतीपुरते नकोत !- गौतम बुद्धांनी विवेक आणि करुणेचा मार्ग दाखवला. राजमाता जिजाऊंनी संस्कार आणि स्वाभिमानाची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटांना संधीमध्ये बदलण्याची प्रेरणा दिली. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही स्वाभिमान आणि संघर्ष सोडला नाही. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, समता, विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला.
मग प्रश्न असा आहे- आपण या विचारांचा वारसा केवळ मिरवतो आहोत की जगतो आहोत ? महापुरुषांचे फोटो लावणे सोपे आहे; त्यांच्या विचारांनुसार जगणे कठीण आहे. मात्र आजच्या युवकांना याच कठीण वाटेवर चालण्याची गरज आहे.
«"महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात स्थान द्या."»
दैववादातून बाहेर, प्रयत्नवादाकडे चला ! - "नशिबात असेल तर मिळेल", "देव बघेल", "माझ्या नशिबातच नाही"- अशी मानसिकता माणसाच्या प्रयत्नांची ताकद कमी करू शकते. देवावर श्रद्धा असणे हा वैयक्तिक विषय आहे; परंतु स्वतःचे कर्तव्य, प्रयत्न आणि जबाबदारी सोडून सर्व काही नशिबावर किंवा दैवावर सोपवणे हा प्रगतीचा मार्ग नाही.
अपयश आले म्हणून आपण अपयशी ठरत नाही. एखादी परीक्षा नापास होणे, नोकरी न मिळणे, व्यवसायात नुकसान होणे किंवा एखादे नाते तुटणे—यापैकी कोणतीही घटना संपूर्ण आयुष्याचा निकाल नसते. एक दार बंद झाले तर दुसरे दार शोधण्याची मानसिकता हवी.
"अंथरूण पाहून पाय पसरावे"—पण अंथरूण मोठे करण्याचा प्रयत्नही हवा ! - आपल्या संस्कृतीत समाधानाला महत्त्व आहे. "ठेविले अनंते तैसेचि राहावे" किंवा "अंथरूण पाहून पाय पसरावे" या विचारांचा सकारात्मक अर्थ आहे; पण त्यांचा अर्थ परिस्थितीसमोर शरण जाणे असा नाही. गरिबी आली म्हणून गरिबीतच राहायचे, अडचण आली म्हणून हात टेकायचे, परिस्थिती बदलत नाही म्हणून प्रयत्नच सोडायचे- ही नकारात्मक मानसिकता बदलली पाहिजे. रिस्थितीचे भान असावे; पण परिस्थिती बदलण्याची जिद्दही असावी.
नोकरीच जीवनाचे अंतिम ध्येय नाही ! - आज अनेक युवकांच्या मनात करिअर म्हणजे नोकरी, आणि नोकरी म्हणजे सरकारी नोकरी, अशी चौकट तयार झाली आहे. नोकरी मिळाली नाही की भविष्य अंधकारमय वाटू लागते. पण जग बदलले आहे. उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप, शेतीपूरक व्यवसाय, सेवा क्षेत्र, डिजिटल कौशल्ये, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, पर्यटन, प्रशिक्षण, फ्रीलान्सिंग अशा अनेक क्षेत्रांत संधी आहेत. नोकरी मागणारे हात महत्त्वाचे आहेत; पण रोजगार निर्माण करणारे हात समाजाला पुढे नेतात. युवकांनी नोकरीची तयारी करताना कौशल्याची, उद्योगाची आणि व्यवसायाची दारेही उघडी ठेवली पाहिजेत.
ज्या वयात घडायचे, त्या वयात वाहवत जाऊ नका !- युवावस्था म्हणजे शरीर, बुद्धी आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचा काळ. पण याच काळात व्यसन, सोशल मीडिया, आभासी जग, अतिरेकी मनोरंजन आणि नातेसंबंधातील गुंतागुंत यामुळे अनेकांचे लक्ष शिक्षण आणि करिअरपासून विचलित होते. प्रेम आणि मैत्री ही जीवनातील स्वाभाविक नाती आहेत. मात्र एखाद्या नात्यातील अपयशामुळे आपले संपूर्ण जीवन संपवणे म्हणजे एका घटनेला संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठे बनवणे होय. तंबाखू, गुटखा, दारू, अमली पदार्थ यांसारख्या व्यसनांपासून दूर राहणे ही केवळ आरोग्याची बाब नाही; ती भविष्यातील जबाबदारीची बाब आहे.
तुमच्यात काय आहे, ते शोधा ! - प्रत्येक तरुणामध्ये काहीतरी विशेष असते. कोणाचा आवाज प्रभावी असतो, कोणाला लेखनाची आवड असते, कोणाला खेळाची, कोणाला तंत्रज्ञानाची, कोणाला शेतीची, कोणाला व्यवसायाची, तर कोणाला कला-संस्कृतीची. पण स्वतःच्या गुणांचा शोध घेण्याऐवजी दुसऱ्याच्या यशाशी तुलना करण्यात ऊर्जा खर्च होत असेल तर निराशा वाढणारच. «"दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करू नका; कालच्या स्वतःला आज मागे टाकण्याचा प्रयत्न करा."»
कौशल्य आत्मसात करा. नवीन गोष्टी शिका. अपयश स्वीकारा. पुन्हा प्रयत्न करा. पुस्तक हातातून गेले आणि मोबाईल हातात आला ! मोबाईल ज्ञानाचे साधनही आहे आणि विचलनाचे माध्यमही. प्रश्न मोबाईलचा नाही; आपण त्याचा वापर कशासाठी करतो याचा आहे. दररोज काही वेळ पुस्तकासाठी, विचारांसाठी आणि स्वतःच्या विकासासाठी दिला पाहिजे.
महापुरुषांची चरित्रे वाचा. संतांचे साहित्य वाचा. विज्ञान समजून घ्या. उद्योजकांच्या संघर्षकथा वाचा. समाजप्रबोधनाची व्याख्याने ऐका. प्रवचने, कीर्तने, चर्चासत्रे आणि वैचारिक कार्यक्रमांना उपस्थित राहा. विचारांची भूक वाढली की निराशेची जागा आशा घेते.
घर बदलले तर पिढी बदलते ! - युवकांच्या मानसिकतेबद्दल बोलताना कुटुंबाची भूमिका विसरता येणार नाही. मुलांना केवळ गुण, नोकरी आणि पैसा यांचे ध्येय देण्यापेक्षा अपयश पचवायला, प्रश्न विचारायला, भावना व्यक्त करायला आणि मदत मागायला शिकवणे आवश्यक आहे. घरातील व्यसनाधीनता, सततचा कलह, अंधश्रद्धा, अवास्तव अपेक्षा किंवा संवादाचा अभाव यांचा मुलांच्या भावविश्वावर परिणाम होऊ शकतो. पालकांनी मुलांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःच्या आचरणातून उदाहरण निर्माण केले पाहिजे.
यशाला शॉर्टकट नसतो ! - आज सोशल मीडियावर काही सेकंदांत यशस्वी झालेल्या व्यक्ती दिसतात; पण त्या यशामागची वर्षानुवर्षांची मेहनत दिसत नाही. पैसा पटकन मिळावा, प्रसिद्धी लगेच मिळावी, करिअर लगेच स्थिर व्हावे, व्यवसायात त्वरित नफा मिळावा—या अपेक्षा वास्तवापासून दूर नेतात. यश म्हणजे मॅरेथॉन आहे; शंभर मीटरची शर्यत नाही. संघर्ष करा. चुका करा. चुका दुरुस्त करा. पुन्हा उभे राहा. सातत्य ठेवा.
चार ओळी
अंधार आला म्हणून सूर्य संपत नसतो,
वादळ आले म्हणून प्रवास थांबत नसतो;
पडला तरी पुन्हा उभा राहतो तोच खरा युवक,
एक अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नसतो !
आजचा खरा प्रश्न - युवकांना आपण किती गुण मिळवले हे विचारतो; पण "तू आनंदी आहेस का?" हे किती वेळा विचारतो ? "नोकरी मिळाली का?" असे विचारतो; पण "तुला कोणते कौशल्य शिकायचे आहे?" असे किती जण विचारतात? "काय झाले?" असे विचारण्यापेक्षा "काय झाले तरी मी तुझ्यासोबत आहे" हा विश्वास देण्याची गरज आहे.
मनातील वेदना लपवण्यापेक्षा त्या व्यक्त करण्याचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. संकटाच्या काळात विश्वासू व्यक्तीशी बोलणे, कुटुंबीयांची साथ घेणे आणि गरज भासल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मदत मागणे कमजोरी नाही; मदत मागणे म्हणजे जगण्याच्या बाजूने उभे राहणे आहे.
युवकांनो, जीवनाची बाजू निवडा !-
बुद्धांचा विवेक घ्या.
जिजाऊंचे संस्कार घ्या.
शिवरायांचे धैर्य घ्या.
संभाजीराजांचा स्वाभिमान घ्या.
फुले-शाहू-आंबेडकरांचा शिक्षण, समता आणि विवेकाचा विचार घ्या.
व्यसनापासून दूर राहा.
अंधश्रद्धेपेक्षा विवेक स्वीकारा.
दैववादापेक्षा प्रयत्नवाद स्वीकारा.
तुलनेपेक्षा कौशल्य स्वीकारा.
शॉर्टकटपेक्षा सातत्य स्वीकारा.
निराशेपेक्षा आशा स्वीकारा.
"आयुष्य कठीण असू शकते; पण ते संपवण्यापेक्षा ते बदलण्यासाठी झगडणे अधिक मोठे आहे."
एक परीक्षा, एक नोकरी, एक प्रेमसंबंध, एक अपयश किंवा एक आर्थिक संकट—यापैकी कोणतीही गोष्ट संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठी नाही.
जीवन अमूल्य आहे.
बोला. व्यक्त व्हा. मदत घ्या. पुन्हा उभे राहा.
/कारण उद्याचा इतिहास लिहिण्याची ताकद आजच्या युवकांच्या हातात आहे!
लेखक:
डॉ. विकास पाटील,व्याख्याते,
व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्तीदूत,समुपदेशक,नोकरी-व्यवसाय मार्गदर्शक.
9881172889,9325701509.
*****
