सोलापूर : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कासेगांव पंचक्रोशीतील जनतेला दिलासा देणारी कामगिरी ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पार पाडली. गेल्या महिन्यात घडलेल्या घरफोडीच्या तीन-चार घटनातील 02 चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या अभिलेखावर उभयतांची सराईत गुन्हेगार अशी नोंद असून त्यांनी नवीन दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
24 ऑगस्ट ची रात्र ते 25 ऑगस्टची सकाळ दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी 03 ते 04 घरफोडी करून चोरी केल्याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडं भा.न्या.सं. कलम 331(3), 331 (4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या चोऱ्यांमुळे गावातील ग्रामस्थ भयाच्या सावटाखाली होते.
त्या गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या.
त्यावरून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासंदर्भात आदेशीत केले होते. एलसीबी सपोनि भिमगोंडा पाटील आणि त्यांचे पथक हे घरफोडी झालेले कासेगांव येथील घटनास्थळी भेट दिली. पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी कासेगांवमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या पथकास घटनेच्या मध्यरात्री 03 अज्ञात इसम सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीतरित्या फिरताना दिसून आले.
तद्नंतर सपोनि भिमगोंडा पाटील यांच्या पथकातील अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले असता, गोपनिय बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा नितीन बाबू भोसले, कमलाकर यशवंत पवार आणि विरप्पा चंदु शिंदे यांनी केल्याची खबर मिळाली.
सपोनि भिमगोंडा पाटील हे पोलीस पथकासह बिस्मील्लानगर मुळेगांव येथे जाऊन संशयित आरोपींचा शोध घेतले असता, आरोपी नितीन बाबू भोसले, कमलाकर यशवंत पवार हे मिळून आल्याने त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी तो गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्या आरोपींकडं कौशल्यपूर्ण तपास करता, त्यांनी त्यांच्या साथीदारासह गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील एक आणि माढा पोलीस ठाण्यातील 101/2026भा. न्या. सं. कलम 331 (3), 331 (4), 305 नवीन दोन गुन्ह्यांचा समावेश आहे.
आरोपी नितीन बाबु भोसले, कमलाकर यशवंत पवार (दोघे रा. बिस्मील्लानगर, मुळेगांव सोलापूर) यांचेकडून उपरोक्त पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यातील चोरीस गेल्या मुद्देमालापैकी 03 ग्रॅम 48 मिली सोन्याचे दागिने रक्कम 45,000 रूपये (बाजार भाव), रोख रक्कम 20, 000 रूपये, इरकल साड्या 3, 000 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 78, 000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हल्ली आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुढील तपास सपोनि भिमगोंडा पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) करीत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व पथकातील पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अजय भोसले, पोकॉ/सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, अन्वर अत्तार, सुनंदा झळके, चापोकॉ/दिलीप थोरात तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/शशीकांत काळेकर यांनी बजावली.
*****

