सोलापूर/प्रतिनिधी : जवळपास तीन वर्षे गंभीर हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या 15 वर्षीय आदित्य वर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये 2026 मधील पहिलं यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. हृदय प्रत्यारोपणानंतर आदित्यची प्रकृती कमालीची सुधारली असून तो लवकरच पुन्हा शाळेत जाण्याच्या तयारीत आहे. अवयव दाता आणि फोर्टिस हॉस्पिटलबरोबर या वर्तुळातीय सर्वांच्या समन्वयातून हे यश लाभलं आहे, अशी माहिती फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टर धनंजय मालकर आणि डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी शनिवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राची दक्षिण काशी असा लौकिक असलेल्या पंढरपुरातील संतपेठेत राहणाऱ्या आदित्य चे वडील व्यवसायाने रिक्षा ड्रायव्हर... आई गृहिणी, 02 बहिणी अशा कुटुंबातील आदित्यला शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड, मात्र खेळत असताना वा दैनंदिन कामे करीत असताना दम भरणं, अचानक हृदयाचे ठोके वाढणे आणि पायांना सूज येण्याबरोबर धाप लागण्याची समस्या डोके वर काढू लागली, दरम्यान राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत त्याचा हृदयाचा आजार पुढे आला.
या आजारावर उपचाराच्या निमित्ताने सोलापूर पंढरपूर अकलूजसह बेंगलोरपर्यंत जाधव कुटुंबीय फिरत राहिले. तत्पूर्वी त्याच्यावर होर्टीजमध्ये हृदयातील झडपेची शस्त्रक्रियाही झाली, मात्र त्याच्या त्रासात म्हणावा असा बदल झाला नव्हता. पुढच्या काळात झालेल्या तपासण्या आणि उपचार याच्या साखळी आदित्य ह्रदयातील समस्येवर हृदय प्रत्यारोपण हा अंतिम इलाज होता. फोर्टिस हॉस्पिटल मधील डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं.
अल्पवयीन आदित्यच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याएवढी जाधव कुटुंबाची आर्थिक कुवत नव्हतीच. त्यांनी शस्त्रक्रिया करण्याची निश्चित भूमिका घेतल्याने, दाता हृदय कधी उपलब्ध होईल हे निश्चित नव्हते. ते उपलब्ध होतात वेळेवर हॉस्पिटलला पोहोचता यावे म्हणून या कुटुंबाने पुणेजवळ केले होते. आदित्यच्या शस्त्रक्रियेसंबंधी वेळोवेळी संपर्क आणि समन्वयातून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण तज्ञ डॉ. धनंजय मालनकर आणि त्यांच्या टीमने, 17 जुलै रोजी या वर्षातील पहिले बाल हृदय प्रत्यारोपण यशस्वीपणे केले. या प्रत्यारोपणानंतर त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यानंतर त्यास 31 ऑगस्ट रोजी घरी सोडण्यात आलं, असल्याचं यावेळी उपस्थित असलेल्या जाधव दाम्पत्यानं सांगितले.
आदित्यची प्रकृती आता चांगली असून येत्या काही आठवड्यांत तो पुन्हा शाळेत जाण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील उपचारांसाठी येण्यापूर्वी पंढरपूर येथे डॉ. ओजस देवकाटे यांनी आदित्यची तपासणीपश्चात वेळोवेळी उपचार आणि उपचाराविषयी पदो-पदी सहकार्य लाभले. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सर्वसमन्वयातून अवयव दाता आणि आर्थिक सहकार्य देणगीरांकडून मिळाल्याने आदित्य, नव्या आयुष्याचा प्रारंभ करीत असल्याचं आदित्यच्या आईनं यावेळी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
त्याच्यावर हृदयाच्या झडपेची दुरुस्ती करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर झडप व्यवस्थित काम करत असतानाही त्याचे हृदय वाढतच राहिले. त्याच्या पायांवर आणि चेहऱ्यावर सूज येत होती तसेच अधूनमधून हृदयाचे ठोके अनियमितपणे वाढत होते.
यानंतर त्याची हृदयाच्या स्नायूंच्या आजारासाठी तपासणी करण्यात आली. एमआरआय तपासणीत त्याला हृदयाच्या उजव्या कप्प्याच्या स्नायूंशी संबंधित गंभीर आजार असल्याचे निदान झाले. प्रकृतीचा त्याच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण हा योग्य पर्याय असल्याचे सांगितले. आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी आदित्यचे नाव फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडच्या हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आलं होतं, असं डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं.
... चौकट
... तातडीनं पोहोचता यावं, यासाठी स्थलांतर - दाता हृदय उपलब्ध होताच उपचारात विलंब होऊ नये यासाठी त्याला रुग्णालयाच्या जवळ राहण्याचा सल्ला देण्यात आला.योग्य दात्याची प्रतीक्षा करणे आदित्य आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते. मुंबईला तातडीने पोहोचता यावे आणि दाता हृदय उपलब्ध झाल्यास वेळ वाया जाऊ नये, यासाठी कुटुंबाने काही महिन्यांसाठी पुण्यात स्थलांतर केले.
... चौकट
इथं उपलब्ध झालं, दाता हृदय ! - वाशी, नवी मुंबई येथील एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 22 वर्षीय तरुणीला मेंदू मृत घोषित करण्यात आल्यानंतर आदित्यसाठी योग्य दाता हृदय उपलब्ध झाले. आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही दात्याच्या कुटुंबाने हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, आतडी आणि रक्तवाहिन्या दान करण्यास संमती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली.
... चौकट
दाता आणि रुग्णालयांमधील समन्वयामुळं प्राप्त झालं यश : डॉ. धनंजय मालनकर - अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित यंत्रणा, दाता आणि रुग्णालयांमधील समन्वय, मुंबईतील अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित यंत्रणा, अवयव काढणे आणि प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय टीम, वाहतूक विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या सहकार्यामुळे दाता हृदय तातडीने फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथे पोहोचवणे शक्य झाले. फोर्टिसच्या हृदय शल्यचिकित्सक, हृदयरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, प्रत्यारोपण तज्ज्ञ, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आदित्यचे प्रत्यारोपण आणि त्यानंतरची प्रकृती सुधारण्याची प्रक्रिया यशस्वी झाली.
17 जुलै रोजी आदित्यवर यशस्वीपणे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. प्रत्यारोपणानंतर आता त्याची प्रकृती चांगली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर तो आता चांगल्या प्रकृतीत आहे. पुन्हा शाळेत जाण्याची आणि पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी हळूहळू सुरू करण्याची त्याला उत्सुकता आहे. सध्या त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घाई न करता पूर्ण विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. मात्र, पुन्हा मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचा विचारच त्याच्यासाठी आजारापूर्वीचे साधे आणि आनंदी आयुष्य परत मिळवण्याची आशा देणारा आहे.
उपचारांबाबत बोलताना फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडच्या बाल हृदयरोग विभागाच्या संचालक डॉ. स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, “आदित्यचा प्रवास दाखवून देतो की मुलांमधील हृदयविकाराचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार किती महत्त्वाचे असतात. मुलांमध्ये हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याची लक्षणे अनेकदा वारंवार होणारे संसर्ग किंवा सामान्य थकवा समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे निदान होईपर्यंत उपचाराचे पर्याय मर्यादित होऊ शकतात. योग्य वेळी उपचार मिळाल्यास औषधोपचार, हृदयाच्या झडपेची दुरुस्ती किंवा गरज भासल्यास हृदय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून मुलांना पुन्हा केवळ आरोग्यच नाही, तर त्यांचे बालपणही अनुभवण्याची संधी मिळू शकते.”आदित्यच्या कुटुंबासाठी हे प्रत्यारोपण अनेक महिन्यांच्या चिंता, त्याग आणि संघर्षानंतर मिळालेले समाधान आहे. अनेक दात्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे उपचारांचा खर्च सांभाळणे कुटुंबाला शक्य झाले.
... चौकट
त्याची श्रद्धा आणि एकाग्रतेने त्याच्या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रकृती सुधारण्यातही सकारात्मक भूमिका बजावली असावी.” : डॉ. धनंजय मालनकर - प्रत्यारोपण शल्यचिकित्सक आणि फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचे हृदय व छातीच्या शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. धनंजय मालनकर म्हणाले, “आदित्यच्या उपचारातील वैद्यकीय आव्हानांपेक्षा त्याचा सकारात्मक दृष्टिकोन आमच्या लक्षात राहिला. तो उत्तम चित्र काढतो.
अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसनयंत्राचा आधार काढल्यानंतर काही वेळातच तो भगवान विठ्ठल आणि गणपतीची चित्रे काढण्यात मग्न झाला होता. त्याची श्रद्धा आणि एकाग्रतेने त्याच्या शस्त्रक्रियेनंतरच्या प्रकृती सुधारण्यातही सकारात्मक भूमिका बजावली असावी.” असं डॉ. मालनकर यांनी यावेळी म्हटले.
-



