महिलेचा विनयभंग; नोकराला 03 वर्षे सक्तमजुरी आणि द्रव्य दंड

shivrajya patra

सोलापूर : घरगडी (नोकर) म्हणून काम करीत असलेल्या आरोपी राजू हनुमंत भंडारे याने त्या घरात 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने राजू भंडारे यास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवत 03 वर्षांपर्यंतची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. 


मागील 04 वर्षांपासून घरगडी (नोकर) म्हणून काम करीत असलेल्या राजू हनुमंत भंडारे (वय -47 वर्षे, रा. घर क्र.184, ब्लॉक क्र. 24, बापुजी नगर, सोलापूर) याने कामास असलेल्या घरात 40 वर्षीय महिलेशी अश्लील संभाषण करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून त्यांच्यावर बळजबरी करत विनयभंग केला. ही घटना गतवर्षी, 26 ऑगस्ट रोजी दुपारी त्या घरातील स्वयंपाकघरात घडली.  


त्या महिलेने याप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात कलम 74, 75 (2), 79 भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राजू हनुमंत भंडारे यास 03 वर्षे सक्तमजुरी आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.


तपास व युक्तिवाद  : या गुन्ह्याचा तपास सपोनि सारिका जगताप यांनी करून दोषारोप पत्र कोर्टात सादर केले तसेच या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता प्रदिपसिंग राजपुत यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून मपोह/नदाफ यांनी काम पाहिले. दोषसिद्धी कक्षाकडील सपोनि राजेश डाकेवाड, मपोह/मैंदाड व बेटकर यांनी कामकाज पाहिले.


... असा आहे शिक्षेचा तपशील - 

1) कलम 74 BNS: 3 वर्षे सक्तमजुरी व  1,000 रूपये दंड (दंड न भरल्यास 01 महिना साधा कारावास).

2) कलम 75 BNS: 1 वर्षे शिक्षा व 1,000 रुपये दंड (दंड न भरल्यास 01 महिना साधा कारावास).

3) कलम 79 BNS: 01 वर्षे शिक्षा व 1,000 रुपये दंड (दंड न भरल्यास 01 महिना साधा कारावास) असा शिक्षेचा तपशील आहे.

****

To Top