उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊन विद्यार्थी जीवनात उच्च पदाला जाऊ शकतो : ॲड. जावेद खैरदी

shivrajya patra

सोशल महाविद्यालयात ‘बझ्म-ए-उर्दू अदब’ च्या उपक्रमाचा प्रारंभ 

सोलापूर : उर्दू माध्यमातून शिक्षण घेऊन विद्यार्थी जीवनात उच्च आणि सर्वोच्च पदांवर पोहोचू शकतात. त्यांनी स्वतःचे उदाहरण देताना सांगितले की, आपणही याच संस्थेतून उर्दू माध्यमातून शिक्षण घेतले असून, आज सोलापूर विद्यापीठात लॉ ऑफिसर म्हणून कार्यरत आहोत. यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्य अत्यावश्यक असल्याचे अॅड. जावेद खैरदी यांनी म्हटले. 

येथील सोशल महाविद्यालयाच्या उर्दू विभागाच्या वतीने ‘बझ्म-ए-उर्दू अदब’ या साहित्यिक उपक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडला. उपक्रमाचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे लॉ ऑफिसर अॅड. जावेद खैरदी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी, उपविभागप्रमुख डॉ. गौसअहमद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी यास्मिन फारूक हंगलगीकर हिच्या कुरआन पठणानं झाली. उर्दू विभागप्रमुख डॉ. मो. शफी चोबदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. जावेद खैरदी यांनी ‘बझ्म-ए-उर्दू अदब’ चे औपचारिक उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, उर्दू विभागाच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करून विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मो. शफी चोबदार  यांनी, उर्दू विभागाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याचा परिचय करून देताना, उर्दू विभागाने आजवर उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे. विभागातील 13 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी पूर्ण केली असून, 20 विद्यार्थ्यांनी NET, SET आणि JRF परीक्षांमध्ये यश मिळविलं आहे. 

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 56 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून सुवर्णपदक प्राप्त केलं आहे. ही कामगिरी उर्दू विभागाच्या गुणवत्तापूर्ण उज्ज्वल् शैक्षणिक परंपरेचे द्योतक असल्याचे डॉ. मो. शफी चोबदार यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे कार्यवाह प्राचार्य ई. जे. तांबोळी यांनी उर्दू विभागाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी विभागातील प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक योगदानाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाची उद्दिष्टे व भूमिका डॉ. गौस अहमद शेख यांनी स्पष्ट केली. त्यांनी ‘बझ्म-ए-उर्दू अदब’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिरुची, भाषिक कौशल्य आणि सर्जनशीलतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. 

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व सहभागींचे आभार मानले.

To Top