अकलूज/ संजय निंबाळकर : शिव मल्हार गड, भोर यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यंदाचा ‘युवा रत्न समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ माळशिरस तालुक्याचे सभापती दत्तात्रय मगर यांना प्रदान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेले उल्लेखनीय कार्य, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली बांधिलकी, विकास कामांचा पाठपुरावा आणि समाज हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार सभापती मगर यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यास केशव उपाध्ये, संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. सोहम महाराज देहूकर, शिव मल्हार गडाचे महंत प्रा. मार्तंड साठे, व्याख्याते विक्रमसिंह मगर, विद्यार्थी काँग्रेस महासचिव कृष्णा साठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून, आजवर केलेल्या कार्याला मिळालेली समाज मान्यतेची पावती आणि भविष्यात आणखी जोमाने जनसेवा करण्याची प्रेरणा असल्याचं सभापती मगर यांनी म्हटलं आहे.
