'संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती
सोलापूर : “ संवाद वारी हा उपक्रम चांगला असून यातून सर्वसामान्य नागरिक, भाविक व वारकऱ्यांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सहजपणे मिळेल. वारीच्या निमित्ताने लाखो लोक एकत्र येतात, त्यामुळे योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे.” असं प्रतिपादन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केले.
पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या ‘संवाद वारी’ या शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसार उपक्रमाला सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सोमवारी, 20 जुलै रोजी भेट दिली. 
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयासमोर माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी प्रदर्शनातील पॅनेल, एलईडी व्हॅन व चित्ररथाची पाहणी करून विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या प्रसंगी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन बोलत होते.
‘संवाद वारी’च्या माध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रोजगार, गृहनिर्माण आदी विभागांच्या योजनांची माहिती पथनाट्य व एलईडीद्वारे देण्यात येत आहे. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी संवाद वारी हे प्रदर्शन नागरिकांसाठी भरवण्यात येत आहे. तरी या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
00000
