पंढरपूर : आषाढी वारी 2026 च्या पावन पर्वावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सहकुटुंब वारीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी व वारकरी संप्रदायाच्या विविध दिंड्यांना भेट देऊन भक्ती भावाने दर्शन घेतले.
संविधान दिंडीतून मूल्यांचा प्रसार
सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित ‘संविधान दिंडी’मध्ये सहभागी होत मंत्री शिरसाट यांनी भारतीय संविधानातील समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. वारकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचे बळ आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारावीत. समाजात सामाजिक सलोखा, समानता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी संविधानाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.” 
व्यसनमुक्ती रथास भेट
यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती रथास भेट देऊन व्यसनमुक्ती अभियानाची माहिती घेतली. युवकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनापासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. 
ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी आयोजित रथासही मंत्री शिरसाट यांनी भेट दिली. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखत त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
वारी हे प्रबोधनाचे व्यासपीठ
“आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संविधान, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती आणि जनकल्याणकारी योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे,” असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नमूद केले.
याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, सहायक आयुक्त सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे, सहायक आयुक्त सातारा सुनील जाधव, बार्टीचे विभाग प्रमुख बबन जोगदंड, शासकीय वसतिगृहाचे गृहपाल, प्रकल्प अधिकारी, समतादूत आदी उपस्थित होते.
***
