राजर्षी शाहू जयंतीदिनी आयोजित राज्यस्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक वितरण
सोलापूर : आयुष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रमाबरोबर त्यात आपली आवड असणे गरजेचे आहे. केवळ कुणी तरी सांगितलं आहे किंवा त्यात पैसा, प्रसिद्धी आहे म्हणून एखाद्या क्षेत्रात येऊ नका तर स्वतःची आवड काय आहे, हे जाणून विद्यार्थ्यांनी स्वतःमधील 'स्व' ओळखून आपली प्रगती करावी, असे विचार नूतन सहायक राज्यकर आयुक्त प्रशांत शिंदे यांनी मांडले.
सहायक राज्यकर आयुक्त प्रशांत शिंदे सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करतेवेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
विचारमंचावर यावेळी नूतन नगर रचनाकार अधिकारी नागेश ढाणे, जैन गुरुकुल प्रशालेचे पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 28 चे मुख्याध्यापक परमेश्वर सुतार, लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नूतन नगररचनाकार अधिकारी नागेश ढाणे म्हणाले की, शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत्त स्तुत्य असून त्याला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे, ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे.
यावेळी पूजा पाटील, स्नेहल जाधव, रमेश वाघमैतर, प्रवीण कस्तुरे, परमेश्वर सुतार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन बुद्धजय भालशंकर यांनी केले तर भोजराज गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय पल्लोऊ, संदीप चव्हाण, साक्षी सोनकांबळे, भौरम्मा वाघमारे, सतीश सोनवले यांनी परिश्रम घेतले.
.... चौकट
मुलांवर समतेचा संस्कार करण्याचा हा उपक्रम अत्यंत मोलाचा : अण्णासाहेब भालशंकर
सध्या महापुरुषांना जाती-जातीत वाटून घेण्याचा निंदनीय प्रकार सुरु आहे. त्यास आवर घालण्यासाठी महापुरुषांचे विचार शालेय जीवनातील मुलांवर बिंबविण्यासाठी निबंध आणि चित्रकला या माध्यमातून मुलांवर समतेचा संस्कार करण्याचा हा उपक्रम अत्यंत मोलाचा असून त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन अण्णासाहेब भालशंकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
***
