नेत्र उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह विश्वासार्ह व परवडणाऱ्या उपचार सुविधांचा घ्यावा लाभ : डायरेक्टर सुधीर सुधाळ

shivrajya patra

शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालयात 6510 रुग्णांना मिळाली नवसंजीवनी !

मोतीबिंदू मुक्त गाव अभियान राबविण्याचा संकल्प

सोलापूर : “डोळ्यांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका. शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर येथे आधुनिक तंत्रज्ञानासह विश्वासार्ह व परवडणाऱ्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन असोसिएट डायरेक्टर सुधीर सुधाळ यांनी केले.

पुणे अंधजन मंडळाचे, शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर, प्रकल्प एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय , यांनी नेत्रसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून रुग्णालयात आतापर्यंत 6510 यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासह लातूर, धाराशिव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो गरजू रुग्णांना या सेवांचा लाभ मिळत आहे.

लहान गावांमधून येणारे शेतकरी, कामगार, मजूर तसेच विविध आर्थिक परिस्थितीतील रुग्णांवर अत्याधुनिक सुविधांद्वारे डोळ्यांचे उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या नेत्ररोगांवर उपचार उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट सेवा दिली जाते.

रुग्णालयात आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, उच्च दर्जाची नेत्र तपासणी सुविधा तसेच अनुभवी व उच्चशिक्षित डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी सर्वसमावेशक नेत्र तपासणी व गुणवत्तापूर्ण उपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मोतीबिंदू मुक्त गांव करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा उपलब्ध असून ग्रामपंचायत, विविध सामाजिक संस्था यांनी सहकार्य करावे.” असंही डायरेक्टर सुधीर सुधाळ यांनी यावेळी सांगितले.

रुग्णालय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत उत्तम नेत्रसेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यातही ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी सेवा कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

To Top