सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात 01.90 कोटी रुपयांचं 950 ग्रॅम मेफेड्रॉन आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा 02 कोटी रुपयांचा जप्त करण्यात आलंय. ही लक्षवेधक कामगिरी शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी 06 वा. च्या सुमारास पाडली. या कामगिरीत दोघांना गजाआड करण्यात आलंय. न्यायालयानं उभयतांना 04 दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी, 12 मे रोजी सकाळी 06.00 वा. गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक सोलापूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना व्ही.आय.पी. रोडकडून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर मुस्लीम कब्रस्तानजवळ पांढऱ्या रंगाची ह्युन्डाई व्हेन्यु कंपनीची एक कार (MH-13 ES- 1411) उभी होती. त्यात अंमली पदार्थ असण्याची पो. कॉ. भारत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली होती.
त्या वाहनासंबंधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांना तात्काळ अवगत करून त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या कारला गराडा घालून चालक सिटवर बसलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याचं नाव रिजवान शब्बीर खान (वय 26 वर्षे रा. अंबिका नगर भाग-3,नई जिंदगी, सोलापूर) असं असल्याचे निष्पन्न झाले. 
सपोनि दत्तात्रय काळे आणि तपास पथकाने तलेल्या झाडा-झडती कारमध्ये ड्रायव्हींग सिटच्या डाव्या ड्राव्हरमध्ये प्लास्टीक पिशवी आढळली. त्यात पांढऱ्या रंगाचा स्फटीक पदार्थ दिसून आला. त्यासंबंधी ताब्यात असलेल्या इसमाकडं विचारणा केली असता,त्याने तो पदार्थ एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्तालयाकडील फॉरेन्सिक टिमला पाचारण करून त्या पांढऱ्या रंगाच्या पदार्थाची रासायनिक तपासणी केली असता, ती पावडर Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्ट अन्वये कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सविस्तर पंचनामा करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांचा तपासाचा मोर्चा 'रिजवान शब्बीर खान याच्याकडे वळला. त्याच्याकडं कसून चौकशी केली असता, Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असलेली प्लास्टीक पिशवी ही साहील पिरजादे (रा. सोलापूर व एक अनोळखी इसमानं अफजल मुर्शद याच्याकडे दिली होती. अफजलने ती पिशवी ही कारच्या ड्रावरमध्ये ठेवली असल्याचं सांगितले.
त्यानुसार रिजवान शब्बीर खान (वय- 26 वर्षे रा. घर नं. 123 अंबिका नगर भाग-3, नई जिंदगी, सोलापूर), साहील सिकंदर पिरजादे (रा. सोलापूर), अफजल मुर्शद यांच्या विरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 21 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
या गुन्ह्यात रिजवान शब्बीर खान आणि साहील सिकंदर पिरजादे (वय- 25 रा. फ्लॅट नं. 406 अल्तमश अपार्टमेंट मंत्रीचंडक नगर, सोलापूर) यांना अटक करण्यात आलीय. न्यायालयानं या आरोपींना 04 दिवस पोलीस कोठडी सुनावलीय. गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
ही लक्षवेधी कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) तथा प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्वीनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिध्दाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे, संजय साळुंखे यांनी पार पाडली.
...गुन्ह्यातील सहभागासंबंधी आरोपीच्या पत्नीचीही चौकशी !
गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये अटकेतील आरोपी साहील सिकंदर पिरजादे याची पत्नी कायनात ऊर्फ कायनात साहील खान, (वय 30 वर्षे, मुळ पत्ता रुम नं. 384, जनता सेवक सोसायटी, एल.जे रोज माहीम (पश्चिम), मुंबई, सध्या रा. फ्लॅट नं. 406 अल्तमश अपार्टमेंट मंत्रीचंडक नगर, सोलापूर) हिच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय.
