सोलापूर : छापा टाकायला गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात गोवा मेड मद्याच्या अवैध गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यात पथकाने 11, 55, 600 रुपयांची दारू जप्त केली. बार्शी तालुक्यातील खामगाव-पिंपळगाव रस्त्यावर पवार फार्म हाऊस शेजारी असणाऱ्या झाडाझुडपामध्ये लपवून ठेवलेल्या मद्य साठा महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत जप्त करण्याता आला.
त्यामध्ये गोवा बनावटीच्या अॅडीरियल व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या1284 सिलबंद बाटल्या (107 बॉक्स) असा एकूण 11, 55, 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन एका इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
माढा तालुक्यातील ऊपळाई गावाच्या हद्दीतील सोलापूर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईसाठी गेलेल्या पथकावर 22 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या मद्य विक्रीत गुंतलेल्या ढाबे मालकांकडून हल्ला झालेला होता. त्यामध्ये अधिकारी व अंमलदारास जबर मारहाण झाली होती. या मारहाणीमध्ये जखमी अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. 
या हल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशावरून सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैधरीत्या मद्य साठवणूक व विक्री करणाऱ्या ढाब्यांची आणि इसमांची माहीती काढून त्यावर कठोर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशावरुन ही कारवाई करून घटनास्थळी असणाऱ्या इसमाला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून या मुद्देमालाबाबत कसून तपास सुरू आहे. यामध्ये अजुनही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.
ही कारवाई विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशावरुन व निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक, विराज माने, धीरज सस्ते, निनाद निकम, स.दु.नि. अलिम शेख, जवान शशिकांत भट, राहुल तारळकर, प्रविण पुसावळे, हुतिक कोळपे आणि वाहन चालक झिंगळे यांनी पार पाडली. दुय्यम निरीक्षक निनाद निकम या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांनी अशा अवैध मद्य विक्री करणाऱ्या ढाबे, गोडाऊन यांची सखोल माहीती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 93 नुसार कारवाई करुन आरोपींना तडीपार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
.... जनतेला आवाहन
सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारे गोवा राज्यातील व बनावट मद्याची माहिती या पथकाला दिल्यास त्यांचं नाव गुपित ठेवण्यात येईल व प्रभावीपणे अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तरी याबाबत टोल फ्री क्रमांक 1800 83 3333 यावर संपर्क साधावा, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क (विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे.) चे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केलं आहे.
