सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासनातर्फे कार्यक्रम
सोलापूर : महात्मा बसवेश्वरांनी कर्मप्रधान, नैतिक व समताधिष्ठित जीवनशैलीचा पुरस्कार करत समाजातील विषमता दूर करण्यासाठी दिलेले तत्त्वज्ञान आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक ठरते, असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्रा. धन्यकुमार बिराजदार यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. बिराजदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
यावेळी प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, अध्यासन केंद्राचे राहुल पावले, प्राचार्य गजानन धरणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बसवेश्वर अध्यासन केंद्राचे प्र. संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
‘महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. बिराजदार यांनी त्यांच्या समतावादी, मानवतावादी व सामाजिक न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. 
दोन महायुद्धांमधील प्रचंड जीवित व वित्तहानीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, अशा विनाशकारी परिस्थिती टाळण्यासाठी सत्य, अहिंसा आणि समरसता ही मूल्ये आजही अत्यावश्यक आहेत. सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता, सहअस्तित्व आणि परस्पर सन्मानाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या समाज परिवर्तनातील योगदानावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिसभा सदस्य व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. रेवा कुलकर्णी यांनी केले.
