संविधानाच्या संरक्षणासाठी लोक लढा उभारण्याची गरज- शंकर पाटील

shivrajya patra
सोलापूर  : संविधान हा या देशाचा आत्मा आहे. महात्मा बुद्ध, महात्मा बसवण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हाच संविधानिक मूल्यांचा पाया आहे, मात्र धर्म केंद्रित राजकारण करणाऱ्यांकडून संविधानाला धोका निर्माण झाल्याचे सांगतानाच संविधानाच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत पाटील बोलत होते.
'जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान' या विषयावर पाटील यांनी भारतीय समाज व्यवस्था, समाजभान आणि आजची जबाबदारी असा पट सविस्तराने मांडला.

महात्मा बसवंणानी 12 व्या शतकात समग्र परिवर्तनाची क्रांती केली. बसवण्णांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. जन्माच्या आधारावरील श्रेष्ठत्व नाकारून समतेची शिकवण दिली. 'कायकवे कैलास' ही जीवन पद्धती सांगितली. म्हणजे श्रम हेच देव. श्रमाधिष्ठित जीवन पद्धती सांगितली. 
कामाला पूजेचे पावित्र्य दिले. दुर्दैवाने आजची व्यवस्था पूजा करणे हेच काम मानणारी आहे. कर्मकांडांचे उदात्तीकरण अतिशय नियोजनबद्धपणे सुरू असल्याची खंत ही पाटील यांनी व्यक्त केली. 

शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांनीही धर्मनिरपेक्ष भूमिकेशी प्रतारणा केल्याने गांधींच्या पक्षात असलेले गांधींच्या मारेकऱ्यांच्या पक्षात सहज मिसळून जात असताना आपल्याला दिसत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 
व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तथा शाहू परीवाराचे प्रमुख प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले. विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. एम. आर. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सोलापूर शहराचा विस्तार होत असताना भौतिक गरजा सोबतच वैचारिक गरजा ओळखून जुळे सोलापूर परिसरात तीन दिवशीय प्रबोधन व्याख्यानमाला सुरू केल्याचे प्रा. कांबळे यांनी सांगितले. 

संविधान पूर्वपीठीकेच्या वाचनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.  याप्रसंगी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, नामदेव पवार, प्रशांत बाबर, ज्येष्ठ विधीज्ञ मेत्रस, राजू मानकर यांच्यासह जुळे सोलापूर परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

++++++
पुष्प दुसरे

रविवार, 12 एप्रिल, 2026

विषयः डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयाची भूमिका.
वक्तेः प्रा.डॉ. विजय माकणीकर शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी.
अध्यक्ष : निजामुद्दिन शेख भारतीय संविधानाचे अभ्यासक, सोलापूर.
To Top