नालसा वीर परिवार सहायता योजनेंतर्गत पार पडला कायदेशीर मदत व जनजागृती मेळावा

shivrajya patra
सोलापूर /09 : नालसा वीर परिवार सहायता योजना-2025 अंतर्गत सेवारत तसेच सेवानिवृत्त सैनिकांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सोलापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी, 08 ऑगस्ट रोजी नालसा वीर परिवार सहायता योजना समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील सैनिक कुटुंबियांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दर मंगळवारी विनामूल्य कायदेशीर मदत दिली जात आहे.

योजनेच्या स्थापनेपासून आजतागायत फौजदारी, दिवाणी, महसूल व इतर अशा एकूण 79 प्रकरणांमध्ये तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करून सैनिकांच्या कुटुंबियांना कायदेशीर सल्ला देण्यात आला आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतीचा अप्रत्यक्ष लाभ झाला आहे.

याच अनुषंगाने मंगळवारी, 07 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर मदत व जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

या बैठकीत अॅड. लक्ष्मण पाटील (पॅनल विधिज्ञ), शिवकैलास झुरळे (उपमुख्य लोकअभिरक्षक), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांनी विविध प्रकरणांतील कायदेशीर मदतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इच्छुक लाभार्थ्यांनी दर मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी भूषविले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

“जागतिक आरोग्य दिना”चे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्यामार्फत वैद्यकीय शिबिराचे आयोजनही करण्यात आले. या शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील डॉ. नित्यानंद चिल्लोळे व डॉ. आरव कांबळे यांच्या टीमने उपस्थितांची वैद्यकीय तपासणी, उपचार व मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास जिल्ह्यातील एकूण 54 माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच संबंधित कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अॅड. लक्ष्मण बाळासाहेब पाटील यांनी केले, तर सहाय्यक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (सोलापूर) संजीव व्यंकटराव पवार यांनी आभार व्यक्त केले.                                                                *****
To Top