सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सर्वच शाळा महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांचे मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन 14 एप्रिल पूर्वी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्हा प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी तसेच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांना दिले आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातील इतर शहरांपेक्षा आगळी-वेगळी साजरी केली जाते. या जयंती पंधरवाड्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक तसेच मनोरंजनाचे उपक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले जातात. बौद्धिक व्याख्यानमालांचे आयोजन केले जातात. आरोग्य निदान शिबीर,रक्तदान शिबिर इत्यादी शिबिरांचे आयोजन केले जाते.
या सर्व कार्यक्रमांमध्ये शहर जिल्ह्यातील बौद्ध बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होतात. एप्रिल महिन्यामध्ये घरावरती रोषणाई केली जाते. लहानथोर मंडळी-अबाल वृद्धांना नवीन पोशाख खरेदी केला जातो. या सर्व बाबींसाठी पैशाची गरज असते. नेमके मार्च पेड इन एप्रिलचे वेतन वर्ष अखेरमुळे उशिराने होते. असे असले तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील बौद्ध बांधव भगिनी यांच्या पवित्र भावना शिक्षण विभागाने ध्यानात घ्याव्यात, असाही या निवेदनात उल्लेख आहे.
दरवर्षी अशी अडचण निर्माण होते. शिक्षण विभाग सहकार्य करतो. याही वर्षी वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पंधरवाड्यात करून सहकार्य करावे, असं निवेदनात महासंघाने म्हटले आहे.
या निवेदनावर महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्रा. प्रकाश शिंदे, रमेश लोखंडे, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रविकुमार देवकर, नीलकंठ शिंगे, निर्मला मौळे, शोभा चंदनशिवे, प्रफुल जानराव, शिवाजी जगताप, संदीप निस्ताने आणि नितीन गायकवाड इत्यादींच्या सह्या आहेत.