सोलापूर : ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित अतिशय प्रतिष्ठित अशा 'डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६' चा निकाल जाहीर झाला असून, उमाबाई श्राविका व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 06 वीचा विद्यार्थी चिरंजीव आयान हरूण तांबोळी याने कांस्य पदक (Bronze Medal) पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे.
असा होता यशाचा मार्ग
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील तर्कशुद्ध विचारांना चालना मिळावी, यासाठी ही स्पर्धा तीन कठीण टप्प्यांत घेतली जाते.
१. लेखी परीक्षा: पहिल्या फेरीत विज्ञानातील मूलभूत ज्ञानावर आधारित परीक्षा.
२. प्रात्यक्षिक परीक्षा: दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांच्या प्रयोग कौशल्याची चाचणी.
३. प्रकल्प व मुलाखत: अंतिम टप्प्यात 'Action Research Project' चे सादरीकरण आणि तज्ज्ञांकडून मुलाखत घेतली जाते.
संशोधनाचा विषय:
अविघटनशील प्लास्टिक कचऱ्याचे कृषी क्षेत्रावरील दुष्परिणाम_ एक क्षेत्रीय अभ्यास ह्या विषयाअंतर्गत कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम शोधून त्यावरील उपाययोजना असा आपला शोधप्रबंध सादर केला होता.
या प्रकल्पासाठी या मार्गावरील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन या प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम जाणून घेतले, आणि यावर उपाययोजना म्हणून केवळ अभ्यासच नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवली.
आयानने केवळ समस्या मांडून न थांबता प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. त्याने ग्रामपंचायत आणि नगरसेवक यांना भेटून सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या कचरा कुंड्या बसवण्याची विनंती केली. सामाजिक संस्थांना 'अन्नदान' किंवा 'पाणी वाटप' करताना प्लास्टिक प्लेट्स व कपांऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले.
त्याच्या या पुढाकारामुळे सोलापूर महानगरपालिका हद्दीत कचरा कुंड्या बसवण्याचे आश्वासनही त्याला मिळाले आहे.शाळेतील प्लास्टिक बंदीच्या नियमामुळे प्रोत्साहित झालेल्या आयानच्या या वैज्ञानिक आणि सामाजिक कार्याचे शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.
अशा या पर्यावरणपूरक संशोधनावर सखोल अभ्यास करून त्याने मांडलेल्या सविस्तर प्रबंधाची दखल घेत रविवारी, 12 एप्रिल रोजी मुंबई येथे झालेल्या यशवंतराव नाट्य सभागृहामध्ये त्याला कांस्यपदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
चिमुकल्या वयात इतका मोठा विचार करणाऱ्या आयानचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.
हा प्रकल्प यशस्वीरित्या सादर करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, सौ. दीप्ती शहा मॅडम उपमुख्याध्यापिका पंडित मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, वर्गशिक्षिका सौ. पल्लवी खांडवे, विज्ञान विषयशिक्षिका सौ. उपाध्ये मॅडम, सोनटक्के मॅडम, बेळ्ळे मॅडम व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख पाटील सर व पालक यांचंही मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.