सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आयोजित डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी, अंडर ट्वेल्व्ह क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समिती सदस्य विक्रांत पवार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धा येथील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी सकाळी विक्रांत पवार यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झाल्यावर प्रारंभाचा सामना युनायटेड क्रिकेट क्लब, साऊथ सोलापूर आपटे ग्रुप यांच्यात झाला. उद्घाटन सोहळ्याला रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रशांत बाबर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष (दक्षिण सोलापूर) प्रशांत गायकवाड, सुखद जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आयोजित डॉ. आंबेडकर क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेसाठी 08 संघांनी सहभाग नोंदविला असून प्रत्येक संघाला साखळी पध्दतीने 04 सामने खेळावे लागतील. या श्रृखंलेत एकूण 32 सामने होतील. 
स्पर्धा प्रारंभाचा पहिला सामना साऊथ सोलापूर आपटे ग्रुप आणि युनायटेड क्रिकेट क्लब यांच्यात झाला. साऊथ सोलापूर संघाने 45 षटकात 06 बाद 263 धावा केल्या. त्यात नील याच्या 67 तन्मय वाघमोडे याच्या 57 धावा संघाच्या एकूण धावसंख्येचा डोंगर उभा करण्यात महत्वपूर्ण ठरल्या.
साऊथ सोलापूर आपटे ग्रुप संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना, युनायटेड संघाचा डाव गडगडला. साऊथ सोलापूर आपटे ग्रुप संघाचा गोलंदाज समर्थ देशेट्टी याच्या अचूक आणि भेदक माऱ्यात, त्यानं 26 धावात 05 बळी घेतले. त्यामुळं युनायटेड संघाच्या 26 षटकात सर्वबाद अवघ्या 127 धावा झाल्या. या सामन्यात युनायटेड संघाला 136 धावांनी पराभव पत्करावा लागला.
मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात अतुल चौधरी आणि साकिब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.
