सोलापूर : कौटुंबिक वाद झाल्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचललेल्या महिलेचा जीव वाचवण्यात दामिनी पथकाच्या कर्तव्य तत्परतेमुळं यश आलंय. कुटुंब कलहाला त्रासलेल्या महिलेनं तलावाच्या पाण्यात उडी मारली होती, दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता, झोकून दिल्यानं त्या महिलेला नवजीवन मिळालंय.
मंगळवारी, 14 एप्रिल रोजी सकाळी 10.55 वाजण्याच्या सुमारास विभाग- 02 कडील दामिनी पथक हद्दीत पेट्रोलिंग करित असताना विजापूर रस्त्यावरील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या बाजूला एक महिला कमर तलाव या ठिकाणी आत्महत्या करत असून तिला वाचवा, असं एका इसमाने दामिनी पथकास कळविले.
त्यानुसार विभाग- 02 दामिनी पथक तात्काळ वन विभागासमोर, कंबर तलाव या ठिकाणी गेले. त्याक्षणी महिलेने पाण्यात उडी मारली होती. दामिनी पथकाने त्या महिलेस पाण्यातून बाहेर काढले व तिचे प्राण वाचविले. 
त्या महिलेने पती-पत्नी कौटुंबिक वाद झाल्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. त्या महिलेचे समुपदेशन करून तिला समजावून सांगण्यात आले. महिलेचे पती व आईला बोलाविण्यात आले. त्यांना समज देऊन महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा म्हेतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती येळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जयश्री कोळी, महिला पोलीस शिपाई सुनिता जाधव आणि महिला पोलीस चालक प्रतिक्षा शिंदे यांनी पार पाडली.
