महात्मा फुले आणि शिक्षण

shivrajya patra


                            =======

हात्मा फुलेंनी अनेक सामाजिक परिवर्तनाचे कार्य केले आहे. त्या सर्व क्रांतिकारी कार्याची सुरुवात मात्र त्यांनी शिक्षणापासून केली आहे. महात्मा फुलेंनी त्यांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात शिक्षणानेच करण्याचे कारण म्हणजे शिक्षणामुळे माणसाचा विविध अंगाने विकास होत असते- प्रगती होत असते.

शिक्षणामुळे माणूस स्वतःला निट समजून घेऊन स्वतःला ओळखतो. स्व ची जाणिव होते. स्वतःचे गुणदोष ओळखायला लागतो. शिक्षणामुळे भूतकाळातील बाबींचा विचार करून भविष्यकाळातील नियोजन करण्याच्या दृष्टीने वर्तमानकाळात तो कार्य करू शकतो.

शिक्षणामुळे मानवाचा आत्मविश्वास वाढतो. सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षणामुळे माणसातील सामाजिक अंगाचा विकास होत असतो.

याकरिताच या भारतभूमितील रंजल्या -गांजल्या, शेतकरी -कष्टकरी समाजामध्ये आत्मबळ निर्माण व्हावे, त्यांच्यात स्वाभिमान निर्माण व्हावे आणि स्वतःच स्वतः चे उद्धारकर्ते व्हावे, याकरिता महात्मा फुलेंनी त्यांच्या सामाजिक क्रांतीची सुरवात शिक्षणाने केली असावी.


आणि म्हणूनच महात्मा फुले म्हणतात....
विद्या विना, मती गेली|
मती विना,  निती गेली |
निती विना, गती गेली |
गती विना, वित्त गेले |
वित्त विना, शूद्र खचले |
एवढे सारे अनर्थ,
एका अविद्येने केले |

इथल्या रंजल्या गांजल्या करिता शाळा सुरु केल्यानंतर त्यांना शिकविणारे सुद्धा असणे आवश्यक आहे. परंतु त्यांना शिकविण्यास इथला उच्च्भ्रू सनातनी  समाज तयार होणार नाही, म्हणून त्यांनी सर्व प्रथम त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुलेंना विद्याविभूषित केले आणि मग 1 जानेवारी 1848 ला मुलींच्या शाळेची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली.

प्रौढ शिक्षणाचे जनक :
भारत स्वतंत्र झाल्याच्या कित्येक वर्षानंतर भारत सरकारने या देशातील प्रौढ नागरिकांना लिहिता - वाचता यावे म्हणून प्रौढांकरिता रात्रीच्या शाळा सुरु केल्या. प्रौढ शिक्षणाची ही संकल्पना सर्वप्रथम या देशात आणली ती महात्मा फुलेंनी.
महात्मा फुले लिखित 'तृतीय रत्न' या नाटकेत ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. (वाचकांनी तृतीय रत्न ही नाटक वाचावं) प्रौढ शिक्षणाने प्रौढ व्यक्तीला त्यांना त्यांचा दररोजचा व्यवहार करणे सोईचा व्हावा व कोणाही व्यक्तीकडून त्यांची फसवणूक होऊ नये हा त्यामागील उद्देश...

बक्षीस नाकारून ग्रंथालयाची मागणी: 

सावित्रीमाई फुलेच्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनी विषयी आपल्याला माहीतच आहे. तिने चौथ्या वर्गात असताना "आम्ही धर्म नसलेली माणसे"*हा निबंध इंग्लंडच्या राणीला लिहिला होता.
हा प्रसंग दुसऱ्या मुली संदर्भातील आहे. प्रसंग असा आहे, महात्मा फुलेच्या शाळेची तपासणी झाल्यानंतर होतकरू विध्यार्थ्यांना बक्षीस दिले जात होते, तेव्हा एक मुलगी शाळा तपासणी करणाऱ्या साहेबाला म्हणाली ते वाक्य आजच्या विद्यार्थ्यांना खूप दिशा देणारे आहे.

ती म्हणाली, "don't give us prizes; give us a school library" या मुलीने बक्षीसाऐवजी ग्रंथालयाची मागणी केली. यावरून महात्मा फुलेंनी तेव्हा शिक्षण किती उच्च कोटीपर्यंत नेऊन ठेवले असणार, याची अनुभूती येण्यास  हे एक उदाहरण पुरेसे आहे.

आज वर्तमानकाळात मात्र आमचे सरकार, नाही त्या ठिकाणी अमाप पैसा खर्च करतात परंतु अजूनही प्राथमिक शाळेत सुसज्ज अशी ग्रंथालय निर्माण करू शकलेले नाही. सरकार जर करत नसेल तर वैयक्तिक स्तरावर आम्ही आमच्या घरी जसे कपड्यांचे कपाटाचे कपाट तयार केले तसे पुस्तकांचा एक कपाट आम्ही निर्माण करू शकलो नाही.

ग्रंथाचे महत्व विशद करतांना महात्मा फुले म्हणतात...
"थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी |"
"ग्रंथ वाचीताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा |"

प्राथमिक शिक्षणावर भर : 

महात्मा फुलेंच्या काळात इंग्रज सरकार प्राथमिक शिक्षणाच्या तुलनेत उच्च शिक्षणावर अधिक लक्ष देत होते. बहुजन समाजाची आता कुठे शिक्षणाला सुरुवात झाली होती. शिक्षणापासून वंचित असलेला समाज शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता सुरवातीच्या काळात त्याच्या प्राथमिक शिक्षणावर अधिक लक्ष देण्याची गरज असते.

जो समाज आधीपासून शिक्षित आहे त्याच समाजाचा फायदा होतो; म्हणूनच महात्मा फुलेंनी हंटर कमिशनकडे जे निवेदन दिले त्यात ते असे म्हणतात, "या देशात सर्वसाधारण समाजाच्या प्राथमिक शिक्षणाची खूप हेळसांड झालेली आहे. काही वर्षात प्राथमिक शाळांची संख्या जरी वाढली असली तरी त्या समाजाची गरज भागविण्याच्या दृष्टीने पुरेशी नाही.

उच्च शिक्षणार्थ पैशाची आणि सवलतिची खैरात करण्यात आणि सामान्य जनतेच्या शिक्षणाची आबाळ करण्यात सरकारचे जे काय हेतू असतील ते असोत. परंतु सामान्य जनतेचा न्यायहित साध्य करण्याच्या दृष्टीने प्राथमिकशिक्षणावर लक्ष देण्याची अधिक गरज आहे.

" आज स्वतंत्र भारतात सुद्धा प्राथमिक शिक्षणाचा आणि आरोग्याचा जो दर्जा असायला पाहिजे आणि ज्या प्रमाणात त्यावर खर्च व्हायला पाहिजे ते होतांना दिसत नाही.  उलट प्राथमिक शिक्षणाची हेळसांड करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडतांना दिसत आहेत. कमी विद्यार्थ्यामागे अधिक शिक्षक नेमण्याऐवजी विद्यार्थी जास्त आणि शिक्षक कमी असे धोरण राबविल्या जात आहे.

पत्नीप्रमाणेच सुनेच्या शिक्षणाकडेही लक्ष: 

आपणा सर्वांनाच माहित आहे की, महात्मा फुलेनी शिक्षणाची सुरवात त्यांच्या पत्नी सावित्रीमाईना शिक्षण देऊन सुरुवात केली. त्यांनी जसं पत्नीला उच्चविद्या विभूषित केलं तसं त्यांच्या सून लक्ष्मीबाई यांच्या शिक्षणाकडेही त्यांनी लक्ष दिलेलं आहे.

महात्मा फुले त्यांच्या व्याहाना पत्र लिहितात आणि त्यात ते लक्ष्मीबाईच्या शिक्षणाबद्दल त्यांना लक्ष देण्याकरिता सांगतात. निदान लक्ष्मीबाईने हायस्कूल पर्यंतचे शिक्षण घ्यावे असे मत ते व्यक्त करतात.

शिक्षण आणि महात्मा फुलेंच्या योजना : 

भारताला स्वतंत्र मिळून जवळपास 75 वर्ष होत आहेत. तरीसुद्धा पालकांनी मुलांना शिक्षण द्यावे, मुलांनी शाळेत यावे म्हणून शासनाला अनेक पालकांकरिता अनेक प्रलोभनीय ज्या योजनाची आखणी करावी लागत असते त्या योजनांची मुहूर्तमेढ महात्मा फुलेनी 150 वर्षाआधीच रोवलेली आहे.

24 सप्टेंबर 1876 च्या सत्यशोधक समाजाच्या रिपोर्ट मध्ये याची चर्चा केलेली आहे. त्या रिपोर्ट मध्ये फुले म्हणतात, शूद्रांच्या (OBC, ST, SC) मुलांना स्कॉलरशिप देण्यात यावी, उत्तम यश मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना सोन्याचे पदक द्यावे, शुद्र विध्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हावी, बोर्डिंग स्थापन व्हावे, मुलींमध्ये अभ्यासाची गोडी लागावी म्हणून चोळीचे खण आणि मुलांना मेण कपडाची डगली करून द्यावी. यावरून महात्मा फुले शिक्षणाच्या बाबतीत किती दूरदृष्टीचे होते हे दिसून येते.

महात्मा फुलेंची  शिक्षणाविषयीची जी तळमळ होती ती एवढ्या बाबतीतच मर्यादित नव्हती. या बाबतित  जेवढं अभ्यास करु तेवढं खोलात जाता येतो. फक्त शिक्षणास त्यांनी किती प्राधान्य दिलं हा या लेखप्रपंचाचा हेतू होता; कारण आज आमच्या मायबाप सरकारने आरोग्या प्रमाणेच शिक्षण या मूलभूत सोयिंना वाऱ्यावर सोडल्या आहेत.

महात्मा फुलेंनी शिक्षणाविषयी  अनेक अंगानी चिंतन केले आहे. शिक्षणाविषयी त्यांनी जे मत मांडले किंवा जे कार्य केले आहे त्यात  खूप काळ गेलेला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड जिवघेणा बदल झालेला आहे. शिक्षणाची सरासरी जसी वाढू लागली आहे तस्या नव्या समस्याही निर्माण होत आहेत.  आजसुद्धा महात्मा फुलेंचे विचार आणि कार्य कालबाह्य तर झालेच नाही उलट या युगातही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत.

शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुलेंच्या विचाराने आमुलाग्रुह बदल करण्याची गरज आहे आणि हा बदल आपण करु शकलो तरच खऱ्या अर्थाने महत्मा फुलेंना आपण अभिवादन केलं असं म्हणता येईल.
(संदर्भ: महात्मा फुले समग्र वाड्:मय, आ. ह. साळुंखे लिखित महात्मा फुले आणि शिक्षण)
@ अनिल भुसारी,
   तुमसर, जिल्हा- भंडारा.

To Top