कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सिद्धार्थ भडकुंबे व लक्ष्मी नागणसूरे यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका तथा माजी उपमहापौर डॉ. नसीम पठाण होत्या.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन कवी अनिल बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘वास्तव’ या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दत्ताजी गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात साहित्याचे सामाजिक भान अधोरेखित केले.
शिवाजी शिंदे यांनी ‘वास्तव्य’ या काव्यसंग्रहाविषयी सविस्तर माहिती देताना ‘आई’, ‘शाळा’, ‘शब्द’, ‘सुख-दुःख’ या कवितांचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. नसीम पठाण यांनी काव्यसंग्रहातील ‘जिंदगी’, ‘शेतकरी’, ‘स्त्रीभ्रूण हत्या’, ‘मोबाईल’ या कवितांचा उल्लेख करत या काव्यसंग्रहाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, या काव्यसंग्रहाची प्रस्तावनाही डॉ. नसीम पठाण यांनीच लिहिली आहे. 
कवी अनिल बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “हे पुस्तक विद्यार्थ्यांना दिशा निश्चित करण्यास प्रेरणादायी ठरेल.” तसेच माजी मुख्याध्यापिका शालिनी नाईकनवरे यांनी देखील काव्यसंग्रहामधील कविततेविषयी सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर आदित्य बनसोडे यांनी उपस्थितांचा आभार व्यक्त केले.
यावेळी सह्याद्री प्रशालेतील आजी-माजी शिक्षकवृंद, बाणेगांव येथील मित्रमंडळ, बनसोडे परिवारातील नातेवाईक तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
