अथर्व जाधव खून खटला : आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर

shivrajya patra

 

सोलापूर : अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खून केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या बाळू उर्फ औदूंबर प्रकाश काळे (रा. विजापूर रोड, सोलापूर) याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमुर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर होऊन न्यायमुर्तींनी आरोपी बाळु उर्फ औदुंबर काळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी हकीकत अशी की, अवैध व्यवसायाच्या आर्थिक हिशोबावरुन आरोपी व त्यांचे भागीदार यांच्यामध्ये वाद उपस्थित झालेला होता. या वादामुळे आरोपी बाळू काळे हा त्याच्या भागीदारांवर चिडून होता. 

शुक्रवारी, 04 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 05 वाजता बाळू काळे व त्याच्या साथीदारांनी कट केला आणि वाहनामधून हत्यार घेऊन इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे पाठीमागील मोकळ्या मैदानातील ऑफिसमध्ये येऊन हिशोबाच्या कागदाची मागणी केली.

ऑफिसमधील सर्व साहित्य व हिशोबाच्या नोंद वह्या ताब्यात घेऊन साहित्याची तोडफोड केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता ऑफिसमधील कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत कामगार अथर्व जाधव यास बांबु, कुऱ्हाड, कोयता आणि तलवार अशा शस्त्राने मारहाण करुन त्यास जखमी केले. त्याचा अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असं सरकार पक्षाचे म्हणणे होते.

यातील आरोपी बाळु उर्फ औदूंबर प्रकाश काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आरोपी बाळू काळे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.  या जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सचिन देशमुख यांच्यासमोर झाली. 

जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये, आरोपीला या खटल्यामध्ये खोटेपणाने गुंतवलेले आहे, अथर्व जाधव याचा मृत्यू हा अपघाती आहे, तसे प्रथम नोंदीवरून दिसून येते, असा युक्तिवाद केला.  हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायमुर्तींनी आरोपी बाळु काळे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर  सरकारतर्फे ॲड. ए. एस. साळगावर यांनी काम पाहिले.

To Top