जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा तुटवडा नाही, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
नागरिकांनी गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी गर्दी न करता ऑनलाइन बुकिंग करण्याचे आवाहन
सोलापूर : जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने २३ मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी लाईन व गर्दी होत असल्याचे दिसून आलेले आहे. तरी गॅस कंपन्यांनी गॅस एजन्सी समोर गर्दी होणार नाही, तेथून गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार नाही त्याप्रमाणेच अवैध गॅस सिलेंडर विक्री होऊ नये, याबाबत सूचना द्याव्यात. अन्यथा प्रशासनाकडून अशा गॅस एजन्सीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव, एचपीसीएलचे सागर चव्हाण व आयओसीएलचे सागर गौतम उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, गॅस कंपन्यांनी गर्दी होत असलेल्या एजन्सींची यादी प्रशासनाला द्यावी. तसेच संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तेथे येणाऱ्या नागरिकांना गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या अनुषंगाने अत्यंत सौजन्याने माहिती सांगावी. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील एजन्सी समोर गर्दी होत आहे का या अनुषंगाने संबंधित सर्व तहसीलदार यांच्याकडून आवाहल मागविण्यात येत आहे. दोन्ही अहवालाची पडताळणी करून आवश्यक त्या गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व गॅस कंपन्यांनी त्यांना वरिष्ठ स्तरावरून सोलापूर जिल्ह्यासाठी दैनंदिन किती प्रमाणात गॅस पुरवठा केला जात आहे, तसेच त्याचे वितरण कशा पद्धतीने होत आहे याची माहिती दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पुरवठा विभागाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
प्रशासन व सर्व गॅस कंपन्या यांच्यामध्ये समन्वय व संवाद असला पाहिजे. त्यामुळे नागरिकांना विहित पद्धतीने व वेळेत गॅस पुरवठा उपलब्ध करण्यात अडचण निर्माण होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
आवाहन :
गॅस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गॅस पुरवठा वितरण यामध्ये सुधारणा होत आहे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर सरासरी साडेचार दिवसात घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा केला जात आहे. तथापि ज्या ठिकाणी बुकिंग झाल्यानंतरही गॅस सिलेंडर मिळण्यास जास्त कालावधी लागत आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त गॅस पुरवठा करण्याचे निर्देश गॅस कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात गॅस उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गॅस सिलेंडर साठी गॅस एजन्सी समोर गर्दी करू नये. गॅस एजन्सी येथून गॅस सिलेंडर मिळणार नाहीत.
ऑनलाइन बुकिंग झाल्यानंतर विहित वेळेत आपल्याला घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा होणार आहे, नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
प्रारंभी तिन्ही गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना उपलब्ध होत असलेल्या एलपीजी गॅसबाबतची माहिती बैठकीत दिली. तसेच काही ठिकाणी नागरिकांना सूचना देऊनही गॅस सिलेंडरसाठी तसेच माहितीसाठी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी पीएम उज्वला गॅस योजनेतून 45 दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध होत आहे, अशी माहिती दिली.
जिल्ह्यात नाही पेट्रोल, डिझेल व एलपीजी चा तुटवडा :
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांकडून पेट्रोल व डिझेलच्या घाईघाईने खरेदीमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असल्याचे राज्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. मात्र, राज्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ही पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व घाईघाईने खरेदी करण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
***