बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्याची करावी सीबीआय चौकशी : संघर्ष समितीचे निदर्शने आंदोलन

shivrajya patra



सोलापूर : सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेत महा घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी आणि बांधकाम कामगारांच्या अन्य प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी, सचिव सोहेल शेख आणि सल्लागार सायबण्णा तेगेळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली.

संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद व निदर्शने कार्यक्रमप्रसंगी, 'महायुती सरकार मुर्दाबाद, शिष्यवृत्ती घोटाळ्याचे सीबीआय चौकशी करा, खाजगी दलालांना अटक करा, प्रत्येक तालुक्यात भांडे वाटप स्वतंत्र केंद्र सुरू करा, बांधकाम कामगारांची नूतनीकरण दर तीन वर्षांनी करा, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, बांधकाम कामगार रक्त तपासणी सुविधा केंद्रावरच करा, ' या प्रमुख मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. 

आंदोलकांनी 'आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही' अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. निदर्शने आंदोलनानंतर १६ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी म्हणाले की, शिष्यवृत्ती घोटाळा नाममात्र असून महायुती सरकार गरीब बांधकाम कामगार योजनेद्वारे महाघोटाळा करीत आहे. या महाघोटाळा महायुतीचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार विभागाचे सर्व अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. 

या महाघोटाळ्याचा संपूर्ण राज्यभर जनजागृती राबविण्याचे जाहीर केले. सेक्रेटरी सोहेल शेख यांनी शिष्यवृत्ती घोटाळ्याचे सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. सल्लागार सायबण्णा तेग्गेळी यांनी या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.

विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलनात सोहेल शेख, सायबण्णा तेग्गेळी, रेखा आडखी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंठला, महालक्ष्मी शेरला, नागमणी रच्चा, नरसय्या मालपुरी, खतीब शेख, एजाज विजापूरे, मुर्तुज आउचकर, सुहाना नदाफ, मेहरूना नदाफ, शकीला शेख, लक्ष्मी येमुल, गौरी इंजामुरे, यासह बांधकाम कामगार सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो ओळी : सोलापुरातील 'बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा', या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना संघर्ष समितीच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत.

To Top