जिजाऊ ज्ञान मंदिरात महिला दिनानिमित्त महिलांचा विशेष सत्कार
सोलापूर : आजच्या स्पर्धेत मातांनी मनातील न्यूनगंडाला छेद देत आपल्या मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून वाघीण बनवणे काळाची गरज आहे, असं प्रतिपादन महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगाव च्या प्राचार्या पीएसआय कविता मुसळे यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे महिला दिनानिमित्त विशेष होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
निवेदक नंदकुमार दुपडे यांच्या दिलखुलास अशा खेळ पैठणीचा या खेळामध्ये अनेक महिला रंगून गेल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी केले.
आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि ठसा उमटविलेल्या महिलांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. या प्रसंगी पीएस आय मुसळे बोलत होत्या
यावेळी पोलीस निरीक्षक कविता मुसळे आणि डॉक्टर कोमल जगताप यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नंदकुमार दुपडे यांनीही महिलांना आपल्या वाणीतून भावनिक साद घालत विनोदी पद्धतीने विचार मांडले.
सत्कारमूर्ती कविता मुसळे यांनी आपल्या जीवनाची विदारक कथा सांगून महिलांशी अतिशय प्रांजळपणे गप्पा मारून महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्याच वेळी महिलांनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेमध्ये पैठणीच्या मानकरी म्हणून पाच महिलांचा विशेष सन्मान आणि पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. त्यात माधुरी देशमुख प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक शितल शिंदे, तृतीय क्रमांक अश्विनी भोसले, चतुर्थ क्रमांक सुनंदा धोत्रे आणि पाचवा क्रमांक अमृता शिंदे यांनी पटकाविला. या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये ज्या सहभागी झालेल्या सर्वच महिलांना यावेळी विशेष आकर्षक भेट वस्तू संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या कार्यक्रमात एम टी एस या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार पोलीस निरीक्षक कविता मुसळे आणि डॉक्टर कोमल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रणशौर्य रविकिरण गुंड, राजवीर विक्रम भोसले, स्वराज प्रमोद पवार, समर्थ कोंडीबा आवताडे, प्रिया विक्रम भोसले आणि प्रणव विजय सावंत या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष अशा प्रकारची मंडप व्यवस्था करण्यात आली होती.
महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची कौतुक करत महिलांनी उंच भरारी घेतली पाहिजे, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्य सुषमा निळ, मुख्याध्यापक वैभव मसलकर आदींसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब निळ यांनी केले तर अर्चना औरादे यांनी आभार व्यक्त केले.