दक्षिण सोलापूर : तालुक्यातील कासेगांव शिवारात असलेल्या दगड खाणीत तीन दिवसांपूर्वी पाण्यात बुडालेल्या श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू या दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृतदेह रविवारी सकाळपूर्वी पाण्यावर आल्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. त्या पाण्याबाहेर काढल्यावर उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाकडं नेण्यात आले. रविवारी दुपारी हृदयद्रावक वातावरणात
त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यश च्या अकाली मृत्यूनं दगड-खाणी ने निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचं दिसतंय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील श्रीहर्ष उपाख्य यश श्रीहरी हब्बू हा जिल्हा परिषद शाळेचा चौथीतील विद्यार्थी गुरुवारी, 12 मार्च रोजी दुपारी पोहण्यासाठी निघालेल्या
त्याच्या काका आणि काकांच्या मित्रांसोबत कासेगांव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील एका दगड-खाणीकडे गेला होता.
त्यास काठावर बसवून सर्वजण पोहत थोड्या अंतरावर गेले असताना काठावर बसलेला यश पाण्यात पडून बुडाला. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.
गुरुवारी दुपारपासून गेले तीन दिवस आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि सोलापूर तालुका पोलीस शोध घेत होते, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली यश ची शोध मोहीम सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून पो.उ.नि. घोडके, पो.नि. देशपांडे डब्ल्यू पी.एस.आय. डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल माळी, तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळाला भेट दिलीय. कासेगांवचे सरपंच यशपाल वाडकर, एएसआय बाणेवाले घटनास्थळीच होते.
यशच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे, फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड पाण्यात बुडालेल्या यश चा शोध घेत होते.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी त्यांच्याकडील उच्च दर्जाचा कॅमेरा जवळपास 70-80 फुटावर अधिक खोलवर सोडून पाहिले, गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली शोध मोहीम सकाळी सुरू झाली तर सायंकाळपर्यंत सुरू होती. शुक्रवारी सायंकाळी अंधार वाढू लागल्यावर खाणीत पाण्यात बुडालेल्या यश चं शोध कार्य थांबविण्यात आलं. शनिवारी सकाळी पुन्हा सुरू झालेलं शोधकार्य रात्रीपर्यंत सुरुच होतं, तरीही तो मिळून आला नाही.
शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान यश चा शोध घेत होते, पाण्यात खोलवर गळ सोडूनही पाहिलं गेलं. ते प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगाने असलेल्या सर्व शक्यता पडताळत श्रीहर्ष उर्फ यश चा शोध घेतला जात होता.
रविवारी सकाळपूर्वी यश पाण्यावर आल्यावर तो तरंगत असल्याचे दिसून आले. त्यास पाण्याबाहेर काढल्यावर शासकीय इस्पितळाकडं नेण्यात आले. तिथं डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले.
ए.एस.आय. बाणेवाले आणि पो.कॉ. अकबर शेख यांनी पंचनामा पूर्ण केल्यावर त्याचं उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन झालं. त्यानंतर शव आप्तेष्ठानी ताब्यात घेतला. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यश च्या अकाली मृत्यूनं या परिसरातील दगड-खाणी नं निर्माण झालेले काही प्रश्न ऐरणीवर येणार असल्याचं दिसतंय.